LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

काठमांडूमध्ये अडकलेले १०२ भाविक नागपुरात सुखरूप दाखल!

नेपाळमधील पुरामुळे काठमांडूत अडकले होते विदर्भातील नागरिक
रेल्वे स्टेशनवर पोहोचताच नातेवाईकांमध्ये आनंदाची लाट
नागपूर : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे काठमांडू येथे अडकलेले नागपूर व विदर्भातील १०२ भाविक अखेर रविवारी पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्टेशनवर सुखरूप परतले. गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पाहून सुटकेचा निःश्वास सोडला.
नागपूरसह विदर्भातील १०६ भाविकांचा समूह १९ ऑगस्ट रोजी नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरासह विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी रवाना झाला होता. २१ ऑगस्ट रोजी त्यांनी पशुपतीनाथ मंदिरात दर्शन घेतले. यात्रा पूर्ण करून हा समूह २५ ऑगस्ट रोजी काठमांडूला परतला. मात्र, याच दरम्यान नेपाळमध्ये पुरामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाल्याने भाविक काठमांडूमध्येच अडकून पडले.
बुधवारी रसुवासह नेपाळच्या इतर भागांत आलेल्या फ्लॅश फ्लडमुळे मोठे नुकसान झाले. २७ ऑगस्टच्या रात्री भाविकांनी काठमांडू सोडले व जनकपूर मार्गे बिहारमधील दानापूर गाठले. तेथून २८ ऑगस्ट रोजी पाटणा येथून ट्रेनने नागपूरकडे रवाना झाले. रेल्वे स्टेशनवर भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सर्व भाविकांचे पुष्पहार घालून स्वागत केले.
दरवर्षी नेपाळला नेले जाते भाविकांना
भाविकांना नेपाळ तीर्थयात्रेला घेऊन जाणारे पंडित श्रीधर त्रिपाठी यांनी सांगितले की, ते दरवर्षी भाविकांना नेपाळला घेऊन जातात. यंदा ११५ भाविक सोबत गेले होते. त्यापैकी ७ जण आधीच परत आले होते.
दरम्यान, या समूहातील निर्मला पांडे (७२) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर काठमांडू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा मुलगा नागपूरहून काठमांडूला पोहोचला आहे.
बीपी वाढला, प्रकृती बिघडली!
नागपूरहून गेलेले भाविक २३ ऑगस्ट रोजी मुक्तीनाथ, त्रिशूली नदी आणि मनोकामना देवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर त्या भागात भीषण पूर आला. आपण ज्या ठिकाणी गेलो होतो, तिथे मोठे नुकसान झाल्याचे कळताच भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे अनेकांचा बीपी वाढला व प्रकृती बिघडली.
या संकटातून सुखरूप बाहेर पडून नागपुरात पोहोचल्याबद्दल तिरंगा चौक येथील रेखा कस्तुरे, शाहूनगर-मानेवाडा येथील नंदा खंते, झिंगाबाई टाकळी येथील अनिता वाकोडे आणि मानेवाडा येथील योगेश गावंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत देवाचे आभार मानले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *