LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

साकोली तलावाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी मंजूर; ९५ हेक्टर क्षेत्र पुन्हा येणार ओलिताखाली

आमदार डॉ. परिणय फुके यांचा पाठपुरावा यशस्वी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
भंडारा (नवचैतन्य) :
साकोली येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आणि मागील वर्षी क्षतिग्रस्त झालेल्या तलावाच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी मृद व जलसंधारण विभागाने ४ कोटी १ लाख ४४ हजार ६३५ रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या ९५ हेक्टर शेतीला पुन्हा सिंचनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते थेट मंत्रालयापर्यंत केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला आहे.
उल्लेखनीय आहे की, गतवर्षी १ ऑगस्ट २०२५ च्या पहाटे या तलावाची मुख्य भिंत अचानक कोसळली होती. पाण्याचा लोंढा शेतात घुसल्यामुळे आजूबाजूच्या सुमारे ४०० हेक्टर कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले होते, तसेच ९५ हेक्टर क्षेत्रातील सिंचन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. शेतकऱ्यांची ही गंभीर अडचण लक्षात घेऊन साकोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक ॲड. मनीष कापगते यांनी आमदार डॉ. परिणय फुके यांची भेट घेत तलाव दुरुस्तीचे निवेदन दिले होते. यानंतर आ. फुके यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, लघु सिंचन विभाग आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून तलावाच्या पुनर्बांधणीची मागणी लावून धरली. तसेच, त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या दुरुस्ती कार्याची निकड आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान निदर्शनास आणून दिले.
शासनाकडून मंजूर झालेल्या या ४ कोटींच्या निधीतून तलावाच्या क्षतिग्रस्त भागाची भक्कम दुरुस्ती, पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी नवीन गेटची उभारणी, तलावाचे खोलीकरण, भिंतीला बळकटी देण्यासाठी पिचिंग आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी पाणी वितरण व्यवस्थेचे सिमेंटीकरण करण्यात येणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर परिसरातील ९५ हेक्टर क्षेत्रात पुन्हा एकदा हक्काची सिंचन सुविधा उपलब्ध होणार असल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याबद्दल साकोली परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी आमदार डॉ. परिणय फुके यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *