सुवर्णकार समाजाच्या सांस्कृतिक व गौरव सोहळ्यात खा. राजेंद्र जैन यांचा सत्कार!
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करणार: खासदार राजेंद्र जैन
गोंदिया: सुवर्णकार सोनार समाज जिल्हा गोंदियाच्या वतीने आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, पोलीस दलात सेवा देणाऱ्या समाजबंधूंचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि भव्य वर-वधू परिचय मेळावा अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला. गोंदिया येथील रिंग रोडवर असलेल्या सुवर्णकार समाज सांस्कृतिक भवनात या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या सोहळ्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले खासदार राजेंद्र जैन यांचा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार राजेंद्र जैन यांनी स्पष्ट केले की, सुवर्णकार समाजाने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या आधुनिक काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी समाजाने शैक्षणिक प्रगतीवर अधिक भर देणे गरजेचे आहे. समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी आणि विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वैयक्तिक तसेच शासकीय पातळीवर जे काही सहकार्य लागेल, ते सर्वतोपरी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गुणवंत विद्यार्थी अन् कर्तृत्ववान पोलिसांचा सन्मान!
या सोहळ्यात सुवर्णकार समाजातील कर्तबगार पोलीस अधिकारी व अंमलदारांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच दहावी-बारावी आणि उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याशिवाय समाजबांधवांना एकत्र आणणाऱ्या वर-वधू परिचय मेळाव्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मान्यवरांची व समाजबांधवांची मोठी उपस्थिती
या भव्य सांस्कृतिक सोहळ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, नगराध्यक्ष सचिन शेंडे, गजूजी फुंडे, तुलसीराम बांगरे, केतन तुरकर, प्रदीप रोकडे, मनीषा येरपुडे, उषाताई हर्षे, राज शुक्ला, मैतुलाताई बिसेन, सुधाकर ढोमणे, मुक्तानंद ढोमणे, भजे साहेब, अमृतराव थानलकर, शैलेश वासनिक आणि सुनील पटले यांच्यासह सुवर्णकार समाजातील पदाधिकारी, महिला मंडळ, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

