कॉलर पकडण्याच्या क्षुल्लक वादातून रक्तरंजित थरार! धारदार शस्त्राने वार करून ३२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
गोंदियातील एकदंत कॉलनी परिसरातील मध्यरात्रीची घटना; संशयित आरोपीला रामनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
गोंदिया : कॉलर पकडल्याच्या अगदी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने भीषण रूप धारण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार शस्त्राने सपासप वार करून ३२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना शुक्रवार, २८ ऑगस्टच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास गोंदिया शहरातील अंगूर बगीचा परिसरातील मोबे हॉस्पिटलजवळील एकदंत कॉलनी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रामनगर पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिथून भैयालाल ठाकरे (वय ३२, रा. नवा टोला, नागरा) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिथून ठाकरे हा आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा केल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री अंगूर बगीचा परिसरातील एकदंत कॉलनी येथे गेला होता. दरम्यान, तेथे त्याचा संदीप देवदास मेश्राम (रा. कटंगी टोला) याच्यासोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास मिथून ठाकरे हा संदीप मेश्राम याच्या घरासमोर पोहोचला. यावेळी मिथूनने कथितरीत्या संदीपची कॉलर पकडून त्याच्याशी धक्काबुक्की केली. कॉलर पकडल्याच्या रागातून संदीप मेश्राम अनावर झाला आणि दोघांमधील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात संदीपने घरातील धारदार शस्त्राने मिथूनवर जोरदार वार केले. या प्राणघातक हल्ल्यात मिथून ठाकरे गंभीररीत्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
रामनगर पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी संदीप मेश्राम याला ताब्यात घेतले आहे.
हत्येमागील नेमके कारण काय होते, हल्ल्यासाठी कोणते शस्त्र वापरण्यात आले आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर सुरू झालेल्या क्षुल्लक वादाचा शेवट थेट हत्येत झाल्याने परिसरात हळहळ व चर्चांना उधाण आले आहे.

