LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

गडचिरोलीत विजेचा थरार: दोन तरुण मजुरांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू!

आरमोरी आणि अहेरी तालुक्यातील घटना; दोन कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर
वडधा / अहेरी :
गडचिरोली जिल्ह्यात विजेचा जोरदार धक्का लागून वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोन तरुण मजुरांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा येथे एका १८ वर्षीय मजुराचा हायव्होल्टेज तारेचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला, तर अहेरी तालुक्यातील बोरी येथे विद्युत खांबावर काम करताना लागलेल्या धक्क्यामुळे एका २० वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुरेश्वर गुलाब लाकडे (वय १८, रा. वडधा) आणि समीर मस्तान शेख (वय २०, रा. बोरी, ता. अहेरी) अशी मृत पावलेल्या तरुण मजुरांची नावे आहेत.
…………………..
लोखंडी सळी हायव्होल्टेज तारेला लागली अन्…
पहिली घटना आरमोरी तालुक्यातील वडधा येथे घडली. मृत मोरेश्वर लाकडे हा २१ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बोडधा येथे एका घराचे स्लॅब टाकण्याचे काम करत होता. छतावर काम करत असताना लोखंडी सळ्या खाली देत असताना, घराच्या बाजूने गेलेल्या हायव्होल्टेज विजेच्या तारांना एका सळीचा अचानक स्पर्श झाला. विजेचा तीव्र धक्का लागल्याने मोरेश्वर छतावरच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
खांबावरून खाली कोसळला; मृत्यूशी झुंज अपयशी
दुसरी घटना अहेरी तालुक्यातील बोरी येथे घडली. मृत समीर मस्तान शेख हा गुरुवार, १८ जून रोजी सकाळच्या सुमारास गावातील विद्युत खांबावर वीज जोडण्याचे काम करत होता. काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार शॉक लागला आणि तो खांबावरून थेट खाली कोसळला. या भीषण अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर २० जून रोजी त्याची प्राणज्योत मालवली. या दोन्ही घटनांमुळे दोन्ही तरुण मजुरांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *