केवल मनगटावरचा धागा नाही, तर अडचणींच्या काळात रक्षण करण्याचे बंधन…
आज रक्षाबंधन : घराघरांमध्ये पसरले उत्साहाचे वातावरण
लांब राहणाऱ्या भावांसाठी ‘डिजिटल’, ‘पोस्टाची’ राखी; लहान मुलांमध्ये मामाच्या गावाला जाण्याचे वेध
बहीण-भावाच्या अथांग प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधन सण उद्या देशभरात साजरा होत आहे. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगातही या सणाचे महत्त्व तिळमात्रही कमी झालेले नाही. कारण, रक्षाबंधन म्हणजे केवळ मनगटावर बांधलेला एक सुंदर धागा किंवा सणाचा सोहळा नाही; तर तो संकटसमयी, अडचणींच्या काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आणि एकमेकांचे रक्षण करण्याचे एक पवित्र बंधन आहे. कोरोनाकाळ आणि त्यानंतरच्या धावपळीच्या आयुष्यात दुरावलेली मने या रेशमी धाग्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहेत. या मंगल दिनासाठी सर्वच सज्ज झाले आहेत.
लांब राहणाऱ्या भावांसाठी ‘डिजिटल’, ‘पोस्टाची’ राखी
जे भाऊ नोकरी, व्यवसायानिमित्त देशाबाहेर किंवा दूर गावी आहेत, त्यांच्यासाठी बहिणींनी डिजिटल माध्यमांचा वापर केला आहे, तर काहींनी आठवड्याभरापूर्वीच पोस्टाद्वारे राखी पाठवली आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून का होईना, पण उद्या बहिणी आपल्या भावाला ओवाळणार आहेत.
मनगटावर राखी अन् डोळ्यात तरळतात आनंदाश्रू..!
रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर तो बहीण आणि भावाच्या मनातील भावनांचा सोहळा आहे. सासरी गेलेली बहीण माहेरी येऊन भावाच्या मनगटावर राखी बांधते, तेव्हा तिच्या डोळ्यांत बालपणाच्या आठवणी दाटून येतात. “भाऊ कितीही मोठा किंवा व्यस्त असला, तरी बहिणीच्या एका राखीसाठी तो बालपणात हरवून जातो,” अशा भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या. बदलत्या काळात राख्यांचे स्वरूप बदलले असले, तरी त्यातील भावनिक ओलावा मात्र तोच आहे.
चिमुकल्यांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध…
“मामाच्या गावाला जाऊया, मोठी गंमत करूया…”, असे गाणे गुणगुणत सध्या घराघरांतील लहान मुले मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सुक झाली आहेत. रक्षाबंधन म्हटले की जेवढा उत्साह मोठ्यांमध्ये असतो, त्याहून कितीतरी अधिक आनंद हा चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. आईच्या माहेरी म्हणजेच मामाच्या गावाला जाने, तिथे भरपूर खेळायला मिळणे आणि मामाकडून हक्काचे गिफ्ट मिळणे यासाठी बच्चेकंपनी प्रचंड उत्सुक आहे. मुलांसाठी मामाचे घर म्हणजे केवळ सुट्टी घालवण्याचे ठिकाण नसते, तर तो हक्काचा विरंगुळा असतो. त्यामुळे उद्याच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मावोगावी जाणाऱ्या एसटी बसेसमध्ये किलबिलाट दिसत आहे.
आकर्षक राख्यांची धूम
उद्याच्या सणासाठी बाजारपेठा रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्यांनी सजल्या आहेत. यंदा बाजारात लहान मुलांसाठी खास कार्टून राख्या, तर मोठ्या भावांसाठी चांदीच्या, गोंड्याच्या आणि रुद्राक्ष राख्यांना मोठी मागणी आहे. यासोबतच बहिणीसाठी खास ओवाळणीचे गिफ्ट्स खरेदी करण्यासाठी भावांची देखील दुकानांमध्ये लगबग सुरू आहे. मिठाईच्या दुकानांमध्येही सकाळपासूनच ग्राहकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.

