LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

बंदोबस्त आटोपून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस अंमलदाराचा मृत्यू

सडक अर्जुनी–सौंदड मार्गावरील तिडका फाट्यानजीक भीषण अपघात
सडक अर्जुनी/गोंदिया :
गांधी जयंतीनिमित्त तहसील कार्यालयात लावण्यात आलेली बंदोबस्ताची कर्तव्य ड्युटी पूर्ण करून दुचाकीने घरी परतणाऱ्या एका पोलीस अंमलदाराचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सडक अर्जुनी–सौंदड मार्गावर तिडका फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या डुग्गीपार पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार ताराचंद दामाजी माहुरे (वय ५७ वर्षे) यांचा नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे गोंदिया जिल्हा पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे की, २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त सडक अर्जुनी तहसील कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर डुग्गीपार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार ताराचंद माहुरे यांची तहसील कार्यालयात बंदोबस्तासाठी ड्युटी लावण्यात आली होती. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास आपली कर्तव्य ड्युटी संपवून ते हिरो सुपर स्प्लेंडर दुचाकीने (क्रमांक MH 36 V 8023) सडक अर्जुनी येथून सौंदडच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले.
पुलाच्या रेलिंगवर आदळले; डोक्याला गंभीर दुखापत
चुलबंद नदीच्या पुलापूर्वी तिडका फाट्यानजीक नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने (क्रमांक MH 49 CW 1937) माहुरे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की माहुरे हे दुचाकीसह रस्त्यालगत असलेल्या पुलाच्या लोखंडी रेलिंगवर जाऊन जोरात आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला अतिशय गंभीर मार लागला तसेच कान व नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला.
नागपूरला नेताना रस्त्यातच प्राणज्योत मालवली
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी भंडारा येथील लक्ष रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे नेत असताना रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात; तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (ठाणेदार) कमलेश सोनटक्के यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक आणि ट्रकचालकाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, हवालदार दीपक खोटेले, घनश्याम उईके आणि सुमेध वालदे पुढील कायदेशीर तपास करीत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *