बेलगाव तलावात कीटकनाशकांचा कहर; हजारो मासे मृत!
मत्स्य व्यवसाय संस्थेचे लाखोचे नुकसान
तलावात विषारी औषध मिसळल्याचा संशय
देवरी : तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतातील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी तलावालगतच्या बांधावर करण्यात आलेल्या कीटकनाशक फवारणीमुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मत्स्य व्यवसाय करणार्या संस्थेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, तलावाचे पाणी विषारी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
बेलगाव येथील गट क्रमांक १४ मधील १.३८ हेक्टर क्षेत्राचा हा तलाव पंकज मत्स्य पालन सहकारी संस्था, पलानगाव यांनी सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या लीजवर घेतला आहे. संस्थेने मागील दोन वर्षांत मत्स्यबीज संचयन करून माशांचे संवर्धन केले होते. त्यामुळे तलावातील मासे साधारणतः १ ते ५ किलो वजनाचे झाले होते. स्थानिक शेतकरी शांतिलाल रामसु पडोटी यांनी तलावालगतच्या बांधावर ‘कोरोला’ व ‘ब्लु चीप’ नावाच्या कीटकनाशकांची फवारणी केली होती. त्यानंतर लगेचच तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत तरंगताना आढळून आले. या मत्स्य पालन करणार्या संस्थेला लाखोचे नुकसान झाले असून तलावातील पाणीही विषायुक्त झाल्याचे बोलले जात आहे.
या घटनेमुळे मत्स्य व्यवसायावर अवलंंबून असलेल्या कुटुंबांच्या रोजीरोटीवर थेट आघात झाला आहे. तलावातील पाण्याचे नमुने, मृत मासे व फवारलेल्या औषधांची प्रयोगशाळेत वैज्ञानिक तपासणी करून कृषी, मत्स्य व महसूल विभागाने तातडीने पंचनामा करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
चिचगड पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेवरून केवळ एका बांधावरील फवारणीने एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मरू शकतात का? की तलावात अन्य कोणते विषारी द्रव्य टाकण्यात आले? असा सवाल उपस्थित होत आहे. संस्थेचे सचिव तुलाराम कुराडे यांच्या माहितीनुसार यामुळे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चिचगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास बिट जमादार देसाई करीत आहेत.

