LatestNewsगोंदिया- भंडारा

भडंगा येथे दारूबंदीचा ऐतिहासिक एल्गार; अवैध दारूविक्रीविरोधात हजारो ग्रामस्थ उतरले रस्त्यावर!

महिला, विद्यार्थी व तरुणांचा अभूतपूर्व सहभाग; दारू विक्रेत्यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी
गोरेगाव/गोंदिया :
गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथे अवैध दारूविक्रीच्या विळख्यातून गावाला मुक्त करण्यासाठी आणि तरुण पिढीचे भविष्य वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी दारूबंदीचा ऐतिहासिक एल्गार पुकारला आहे. ग्रामपंचायत कार्यालयापासून काढण्यात आलेल्या भव्य महारॅलीत हजारो महिला, युवक, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन सहभाग नोंदवला. या अभूतपूर्व जनआक्रोशामुळे संपूर्ण भडंगा गाव दारूबंदीच्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेले होते.
दारूच्या व्यसनामुळे अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त होत असून गावात कौटुंबिक कलह, वादविवाद आणि आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गावातील शांतता धोक्यात आणणाऱ्या आणि तरुणांना व्यसनाच्या खाईत लोटणाऱ्या अवैध दारू धंद्यांना कायमचा पायबंद घालण्यासाठी संपूर्ण गाव आता एकवटले आहे. महारॅलीदरम्यान संतप्त ग्रामस्थांनी गावात छुप्या मार्गाने दारू विकणाऱ्यांच्या घरासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली आणि अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचा कडक इशारा दिला. या रॅलीच्या पूर्वसंध्येला गोरेगाव पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
महिला व विद्यार्थ्यांचा आक्रमक पुढाकार!
दारूच्या व्यसनाचा सर्वाधिक जाच घरातील महिलांना सहन करावा लागत असल्याने गावातील रणरागिणींनी या लढ्यात आघाडी घेतली. तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात दारूबंदीचे फलक घेऊन रॅलीत सहभाग नोंदवल्याने या आंदोलनाला एक भावनिक अधिष्ठान प्राप्त झाले. “अवैध दारूविक्रीमुळे भविष्यात गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस व महसूल प्रशासनाची असेल,” असा स्पष्ट इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
आता प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष!
ग्रामस्थांनी आपल्या एकजुटीची ताकद दाखवून दिल्यानंतर आता गोरेगाव पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग या गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर नेमकी काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारवाईत टाळाटाळ झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जनजागृती मोहिमेत गावकऱ्यांची मोठी उपस्थिती
या ऐतिहासिक दारूबंदी मोहिमेत दारूबंदी समितीचे अध्यक्ष नरेंद्र खोब्रागडे, सरपंच अतुल मोटघरे, उपसरपंच बाबुलाल मस्करे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र रहांगडाले, उज्ज्वल राऊत, रेवचंद कवास, बाळकृष्ण मेश्राम, प्रीतमलाल नंदेश्वर, लोकचंद शरणागत, स्वाती टेंभूर्णीकर, पिंकी मंडिये, अलका राऊत, ललिता लिल्हारे, प्रमिला भोयर, भामेश्वरी पटले, पोलीस पाटील सीमाताई नंदेश्वर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *