HealthLatestगोंदिया- भंडाराविदर्भ

कोरणी घाट तीर्थक्षेत्रासाठी सर्विस रोडला ‘एनएचआयए’ ची मंजुरी

खा.प्रफुल्ल पटेल व खा.राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नांना यश
गोंदिया :
तालुक्यातील कोरणी घाट येथील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्रावर येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्गावरून नवीन अप्रोच मार्ग (सर्विस रोड) उभारण्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचआयए) अधिकृत मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला सक्षम प्राधिकरणाकडून ६ ऑगस्ट २०२६ रोजी मंजुरी मिळाली असून, आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या मार्गाला मंजुरी मिळावी, यासाठी खा.प्रफुल पटेल व खा.राजेंद्र जैन यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून सर्विस रोडमुळे भाविकांची अडचण दूर होणार आहे.
कोरणी घाट येथे दरवर्षी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह गणेशोत्सव व नवरात्रौत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. मात्र नदीपात्राकडे जाणारा सद्यस्थितीतील रस्ता अत्यंत अरुंद व खराब असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे येथे नवीन रस्ता तयार करण्याची मागणी मंदिर ट्रस्ट, विविध मंडळे व स्थानिक ग्रामस्थांकडून बर्‍याच दिवसांपासून केली जात होती. या मागणीची दखल घेत खा.प्रफुल पटेल व खा.राजेंद्र जैन यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे सतत पाठपुरावा केला. अखेर राष्ट्रीय महामार्गावरून नवीन सर्विस रोड उभारण्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचआयए) अधिकृत मंजुरी दिली आहे.
उल्लेखनिय असे की, भाविकांच्या या समस्येकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केतन तुरकर यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांचे लक्ष वेधून सतत पाठपुरावा केला होता. दोन्ही खासदारांनी तातडीने एनएचआयएच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी पत्र व्यवहार करून नवीन रस्त्याची मागणी लावून धरली. अखेर एनएचआयएच्या छिंदवाडा प्रकल्प अंमलबजावणी घटकाने या सर्विस रोडच्या बांधकामाला मंजुरी प्रदान केली. नवीन सर्विस रोडमुळे कोरणी घाट येथे येणार्‍या भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून धार्मिक सोहळ्यांच्या आयोजनास मोठी मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी खा.प्रफुल्ल पटेल व खा.राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *