महागाई, बेरोजगारीविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार; तहसीलवर मोर्चा
आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी : प्रलंबित समस्यांकडे वेधले लक्ष; सरकारी धोरणांवर हल्ला
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात सावली येथे जनआक्रोश मोर्चा
सावली ( चंद्रपूर) : गगनाला भिडलेली महागाई, रोजगाराचा प्रश्न, पेट्रोल-डिझेल, गॅस आणि रासायनिक खतांच्या दरवाढीने होरपळ सुरू असल्याचा आरोप करीत नागरिकांनी गुरुवारी (दि. २७) बैलगाड्यांसह थेट तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात सर्वसामान्य जनता, शेतकरी व तरुणांच्या उपस्थितीने सावली शहर दणाणून गेले होते.
जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसने केले. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशा घोषणा देणाऱ्यांच्या काळात लूट सुरू असून, सरकारच्या धोरणांमुळे जनता आर्थिक संकटात सापडली आहे, असा थेट हल्लाबोल मोर्चादरम्यान विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. भर पावसात बैलगाडीवर स्वार होऊन निघालेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तहसीलदारांना निवेदन देऊन दरवाढ मागे घेण्याची, खतांचे दर कमी करणे व बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी करण्यात आली.
शिक्षक व पोषण आहारासाठी विद्यार्थी रस्त्यावर
सिंदेवाही : शिक्षक द्या, पोषण आहार आणि पुस्तके मिळू द्या, अशी मागणी करीत तालुक्यातील कळमगाव (गन्ना) येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसह थेट रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
कळमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत एकूण २२० विद्यार्थी शिकत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या पटसंख्येसाठी केवळ ५ शिक्षक कार्यरत असून २ पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्यान्ह भोजन बंद असल्याने विद्यार्थ्यांना दुपारी जेवणासाठी घरी जावे लागत होते. शाळा सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेही मिळालेली नव्हती.
या मूलभूत प्रश्नांवर संतप्त पालकांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष दुर्मिळ रामटेके आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या नेतृत्वात मंगळवारी (दि. २५) आंदोलनाचे हत्यार उपसले. पोलीस प्रशासन, गट शिक्षण अधिकारी स्वप्नील हांडेकर आणि शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पिसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिक्षण विभागाने रिक्त पदांवर शिक्षक नियुक्ती, नियमित पोषण आहार आणि पुस्तके उपलब्ध करून देण्याचे अधिकृत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पावसात निघाला मोर्चा
सावलीत मोर्चादरम्यान पाऊस आला. मात्र नागरिक उत्साहाने सहभागी झाले. यामध्ये काँग्रेस नेते दिनेश चितनूरवार, तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, शहराध्यक्ष कृष्णा राऊत, महिला काँग्रेस अध्यक्ष उषा भोयर, शहर महिला अध्यक्ष भारती चौधरी, नगराध्यक्ष साधना चाधोई, लता लाकडे, विजय कोरेवार, राकेश गहुमवार, कृउबा सभापती राजू ठाकरे आदींसह तालुक्यातील महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


