LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

पतंजली मेगा स्टोर्सवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, १२ हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!

गोंदिया (प्रतिनिधी) : दिशाभूल करणाऱ्या औषध जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गोंदियात एक मोठी कारवाई केली आहे. शनिवार, ६ जून रोजी आरटीओ कार्यालयाजवळ, गोरेगाव रोड येथील पतंजली मेगा स्टोर्सवर अचानक छापा टाकून पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाने १२ हजार ८४४ रुपये किमतीच्या आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्तांनी गोरेगाव रोडवरील पतंजली मेगा स्टोर्सची अचानक तपासणी केली. या तपासणी दरम्यान स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या काही आयुर्वेदिक औषधांच्या संदर्भात आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या औषधांमध्ये प्रामुख्याने दिव्य महामंजिष्ठादि क्वाथ, दिव्य खदिरारिष्ट, दिव्य शिलाजीत ड्रॉप्स, पतंजली कारले-जांभूळ ज्यूस आणि दिव्य मेदोहर वटी यांचा समावेश आहे. या औषधांच्या जाहिरातींमध्ये मधुमेह (डायबेटीस), कुष्ठरोग आणि लठ्ठपणा (वजन कमी करणे) यांसारख्या गंभीर आजारांवर प्रभावी उपचार आणि खात्रीशीर गुण येत असल्याचे दावे करण्यात आले होते, जे नियमांचे उल्लंघन करणारे आहेत.
औषध विज्ञानानुसार अशा प्रकारचे दिशाभूल करणारे दावे करणे कायद्याने गुन्हा असल्याने, अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करत १२ हजार ८४४ रुपये मूल्याची आक्षेपार्ह आयुर्वेदिक औषधे जप्त केली. सदर धडक कारवाई औषध निरीक्षक अभिषेक चवरडोल आणि सहाय्यक आयुक्त आतिश सरकाले यांच्या पथकाने केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *