अग्निकांड : ‘एसएनसीयू’ला लागले सील; फॉरेन्सिक विभागाकडून ‘स्पॉट’ पंचनामा
पोलिसांच्या उपस्थितीत फायर फॉरेन्सिक एक्सपर्टकडून तांत्रिक अभ्यास; नागपूर येथील पथकाने केली पाहणी
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) घडलेल्या भीषण अग्निकांडाच्या तपासाला आता वेग आला आहे. ज्या एसएनसीयू विभागात आग लागून चिमुकल्यांचा मृत्यू झाला, गुरुवारी सकाळी ‘त्या’ घटनास्थळाला सील करण्यात आले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत या विभागात अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी फॉरेन्सिक विभागाचे फायर तज्ज्ञ अधिकारी पथक, विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा विभाग आता बंद करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. विभागातील प्रत्येक बाबीची बारकाईने पाहणी करून आगीचा नेमका उगम कुठून झाला, कोणत्या उपकरणामुळे अथवा विद्युत यंत्रणेमुळे आग लागली का, यासह विविध शक्यता तपासण्यात येत आहेत.
या तपासासाठी नागपूर येथील फॉरेन्सिक फायर तज्ज्ञ निलेश उकडे, फॉरेन्सिकच्या रेणुका फडके, जयेश कोपरे तसेच नितीन कोवळी, मनोहर जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून आग लागण्यापूर्वीची परिस्थिती, आगीचा प्रसार आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती याबाबत माहिती संकलित केली. तसेच घटनास्थळी उपलब्ध असलेल्या उपकरणांची आणि विद्युत यंत्रणेचीही तपासणी केल्याची माहिती आहे. एसएनसीयूमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत प्राथमिक स्तरावर शॉर्टसर्किटची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, केवळ प्राथमिक अंदाजावर न थांबता फॉरेन्सिक आणि अग्निशमन विभागाकडून तांत्रिक तपास केला जात आहे. या तपासातूनच आगीचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. पाहणी दरम्यान पोलीस निरीक्षक विजया पंधरे, एपीआय अमर वसावे व चमूदेखील उपस्थित होती.
फायर फॉरेन्सिक एक्सपर्टकडून तांत्रिक अभ्यास
जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू मधील व्हेंटिलेटर स्फोटात तीन नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी एका बाजूला राज्य शासनाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असताना, गाडगे नगर पोलिसांनी नोंदविलेल्या तीन स्वतंत्र आकस्मिक मृत्यूच्या तपासाला मोठी गती देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. जीशान इनामदार यांच्या तक्रारीवरून २४ ऑगस्ट रोजी ही स्वतंत्र नोंद करण्यात आली होती.
पोललीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी एका खाजगी फायर फॉरेन्सिक एक्सपर्टची मदत घेतली असून, गेल्या दोन दिवसांपासून हे तज्ज्ञ अधिकारी संबंधित वॉर्डची पाहणी करून तांत्रिक अभ्यास करत आहेत. याशिवाय, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे यांच्याशी समन्वय साधून बालकांच्या डीएनए नमुन्यांसाठी विशेष किट मागविण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
२४ ऑगस्ट रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास एसएनसीयू वॉर्डमधील व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता. यात तीन नवजातांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाचे नेमके कारण काय असावे? तिथे ज्वलनशील पदार्थ अस्तित्वात होते का? या तांत्रिक मुद्द्यांवर स्पष्टता आणण्यासाठी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अधिकृत अहवाल मागवला आहे.

