नवेगावबांध आता ‘पुस्तकांचे गाव’; नागपूर विभागातील पहिल्या पुस्तक दालनाचे लोकार्पण
उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
गावात साकारणार १० वाचन कट्टे; पर्यटनाला मिळणार ज्ञानसंस्कृतीची जोड
नवेगावबांध (अर्जुनी मोरगाव) : निसर्गसंपदा आणि पर्यटनासाठी राज्यभरात ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांधच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नागपूर विभागातील पहिले ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवेगावबांधला नवी ओळख मिळाली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उभारण्यात आलेल्या पुस्तक दालनाचे लोकार्पण उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मंदार पत्की, पद्मश्री परशुराम खुणे, जि. प. सदस्य रचना गहाणे, सरपंच हिरा पंधरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे, डॉ. अ. का. कापगते, समन्वयक रामदास बोरकर, एच. पी. गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांचे बँड पथक आणि लेझीमच्या तालात मान्यवरांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन व फीत कापून दालनाचे विधिवत उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना ना. डॉ. उदय सामंत यांनी, निसर्गाच्या सान्निध्यात वाचन संस्कृती रुजवणारा हा उपक्रम भावी पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार राजकुमार बडोले यांनीही या उपक्रमाचे महत्त्व विशद करत नवेगावबांधच्या शिरपेचातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले.
गावात उभारणार १० वाचन कट्टे
या उपक्रमांतर्गत नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. गावात सध्या एका वाचन कट्ट्याचे उद्घाटन झाले असून, लवकरच आणखी ९ वाचन कट्टे तयार करण्यात येणार आहेत. एकूण १० कट्ट्यांच्या माध्यमातून पुस्तक आणि वाचक यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा मानस आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद मेश्राम यांनी केले. संचालन प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी तर आभार प्रदर्शन रामदास बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवेगावबांध फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

