LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यू-मलेरियाचा उद्रेक; ५६ रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागात खळबळ!

३.२९ लाख रक्ताचे नमुने घेऊनही प्रशासनाची धावपळ; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर!

चंद्रपूर : मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाने डेंग्यू-मलेरिया नियंत्रण मोहिमेसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. जिल्ह्यातील संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबवली जात असून आतापर्यंत ३ लाख २९ हजार ५५८ पेक्षा जास्त लोकांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. या महातपासणी मोहिमेत डेंग्यूचे ३६ आणि मलेरियाचे २० रुग्ण निष्पन्न झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. ‘लॉ अँड ऑर्डर’प्रमाणेच आता आरोग्य व्यवस्था सांभाळण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका ग्रामीण तसेच शहरी भागातील गल्लीबोळात घरोघरी जाऊन ताप सर्वेक्षण करत आहेत आणि संशयितांचे रक्त नमुने गोळा करत आहेत.दुसरीकडे, जिल्हा मलेरिया निर्मूलन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत कडक इशारा दिला आहे. केवळ सरकारी मोहिमेवर विसंबून न राहता नागरिकांनी स्वतःच्या घराची आणि परिसराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. साचलेले पाणी, खिडक्या-दारांना जाळ्या नसणे आणि उघड्या अंगाने फिरणे आजाराला आमंत्रण ठरत आहे. प्रशासनाने नागरिकांना दर मंगळवारी सक्तीने ‘ड्राय डे’ पाळण्याचे आवाहन केले आहे, ज्यामध्ये कुलर, पाण्याच्या टाक्या, कुंड्या आणि फ्रिजमधील साचलेले पाणी उपसून ते कोरडे करणे बंधनकारक आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी स्पष्ट केले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी मान्सूनमध्ये डासांची पैदास वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता वेळीच खबरदारी घ्यावी. आरोग्य विभाग प्रत्येक रुग्णावर औषधोपचार आणि बारीक लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत रुग्णाची प्रकृती गंभीर होणार नाही, यासाठी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *