LatestNewsगोंदिया- भंडारा

पदावर असताना कामे करणाऱ्यांनाच मतदार आठवणीत ठेवतो: उद्योगमंत्री उदय सामंत

भंडारा येथे शिवसेना मेळाव्यात घणाघात!
भंडारा :
“राजकारणात पदे येत-जात असतात, परंतु पदावर असताना ज्यांनी प्रत्यक्ष कामे केली आहेत, त्यांनाच मतदार नेहमी आठवणीत ठेवतात. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणण्याची नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
भंडारा येथील बालाजी सभागृहात आयोजित ‘भंडारा जिल्हा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात’ ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, संपर्क प्रमुखांसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री सामंत म्हणाले की, खांद्यावर भगवा दुपट्टा घेऊन बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आहे. शिवसेनेला क्रमांक एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देतानाच त्यांनी भंडारा जिल्ह्यातील ‘भेल’ (BHEL) प्रकल्पाच्या मोकळ्या जागेवर आता भव्य स्टील प्लांट उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाला उजाळा देताना सांगितले की, “२००९ पासून अनेक उतार-चढाव पाहिले, आमदाराकीच्या अनेक ऑफर्स आल्या, तरीही आम्ही शिवसैनिक म्हणून ठाम राहिलो.” भंडारा जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाली असून पक्षाला क्रमांक एकवर आणणे हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्याला शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर, उपजिल्हा प्रमुख विकास मदनकर, सुरेश धुर्वे, विजय काटेखाये, किशोर पंचभाई, नरेश उचबगले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सविता तुरकर, युवा सेना प्रमुख अंकुश वंजारी, नितीन सेलोकर, माजी जि.प. उपाध्यक्ष दीपक गजभिये यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते. मेळाव्याचे संचालन व आभार प्रदर्शन पवनी शहर प्रमुख अनिल ढकाते यांनी केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *