LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

पैशासाठी गद्दारी करणाऱ्या खासदारांना ‘शिवसेना स्टाईल’ने धडा शिकवणार

६० कोटींत विकले गेल्याचा ‘उद्धव सेने’चा खळबळजनक आरोप!
यवतमाळमध्ये शिवसैनिकांचा संताप; संजय देशमुखांच्या पुतळ्याचे दहन
यवतमाळ :
तब्बल १३ वर्षे राजकीय विजनवासात असलेल्या संजय देशमुखांना उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची उमेदवारी देऊन निवडून आणले. मात्र, खासदार होताच देशमुखांनी पक्षाशी गद्दारी करून महायुतीशी घरोबा केला. या गद्दारीमुळे संतापलेल्या उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी यवतमाळमधील सेलिब्रेशन हॉलमध्ये जाहीर निषेध सभा घेतली. “आता नुसते दुःख व्यक्त करत बसणार नाही, तर गद्दार खासदार जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्याने मारू, गुन्हे दाखल झाले तरी परवा नाही,” अशा आक्रमक शब्दांत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला.

‘पैसे घेतल्याशिवाय ते विमानात बसायला तयार नव्हते!’
सभेला संबोधित करताना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “खासदार देशमुख हे तब्बल ६० कोटी रुपयांत विकले गेले आहेत. दिल्लीला जाताना पैसे हातात पडल्याशिवाय ते विमानात बसायलाही तयार नव्हते.” यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोली-उमरखेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. मतदारसंघात कुठेही हे गद्दार आले, तर पोलीस किंवा सुरक्षा रक्षक भेदून त्यांना ‘शिवसेना स्टाईल’ने धडा शिकवा, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
मेडिकल चौकात प्रतीकात्मक पुतळा जाळला! निषेध सभेपूर्वी उद्धव सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मेडिकल कॉलेज चौकात एकत्र येत खासदार संजय देशमुख यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी गद्दारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आ. देरकरांनी दिला धीर: “कोणी गेल्याने पक्ष थांबत नसतो!”
या कठीण प्रसंगी वणीचे आमदार संजय देरकर यांनी शिवसैनिकांना धीर दिला. ते म्हणाले, “पालकमंत्री संजय राठोड यांनी पक्ष सोडल्यानंतर मी शिवसेनेत आलो. त्यांनी मलाही शिंदेसेनेत येण्याचा आग्रह केला होता, पण मी निष्ठा बदलली नाही. ज्यांना विधानसभेचे तिकीट मिळवून दिले, ते संजय देशमुख आज पक्ष सोडून गेले. पण लक्षात ठेवा, कोणी गेल्याने पक्ष थांबत नसतो. मी वणीचा आमदार असलो तरी आता पूर्ण जिल्ह्याकडे लक्ष देईन. कुठलेही काम असो, मला सांगा, मी तन-मन-धनाने तुमच्या पाठीशी उभा आहे.”
१३ वर्षांचा वनवास संपवला, त्यांनी विश्वासघात केला!
या निषेध सभेला आमदार संजय देरकर, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, संजय निखाडे, कल्पना दरवई यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. १३ वर्षे राजकारणातून बाजूला पडलेल्या देशमुखांना विनायक राऊत यांनी मुंबईत नेऊन उमेदवारी जाहीर केली होती. मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवला, मात्र खासदार होताच त्यांनी मतदारांचा आणि पक्षाचा घोर विश्वासघात केल्याचा सूर या सभेत उमटला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *