LatestNewsगोंदियाविदर्भ

तलावात रासायनिक विषबाधेने हजारो मासे मृत्यूमुखी!

शेतातील औषधीयुक्त पाणी शिरल्याने लाखो रुपयांची मत्स्यसंपत्ती नष्ट; ३ लाखांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी
सडक अर्जुनी : शहरातील प्रभाग क्रमांक ८ लगत असलेल्या गाव तलावात मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तलावाकाठच्या शेतात भात पिकावर फवारण्यात आलेली रासायनिक औषधे पावसाच्या पाण्यासोबत वाहून थेट तलावात मिसळल्याने ही भीषण विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विषबाधेमुळे तलावातील हजारो मासे तडफडून मरण पावले असून, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे अंदाजे ३ लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी गाव तलावाच्या पाण्यात मोठ्या संख्येने मृत मासे तरंगताना नागरिकांच्या दृष्टीस पडले. तलावाच्या लगत असलेल्या शेतांमध्ये भात पिकावरील कीटकनाशक व रासायनिक औषधांची मोठ्या प्रमाणावर फवारणी करण्यात आली होती. शेतातून वाहून आलेल्या रासायनिक घटकांमुळे तलावाचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आणि पाण्याची गुणवत्ता ढासळल्याने संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
या तलावात ‘लक्ष्मी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित, सडक अर्जुनी’ च्या माध्यमातून मत्स्यपालन केले जात होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संस्थेच्या सभासदांवर आर्थिक संकट कोसळले असून सभासदांमध्ये तीव्र चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे.
दोषींवर कायदेशीर कारवाई अन् नुकसानभरपाई द्या!
या रासायनिक विषबाधेमुळे संस्थेचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्षभराची मेहनत क्षणात वाया गेल्याने मत्स्यपालक हवालदिल झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, दूषित पाण्याचे नमुने तपासून दोषी व्यक्तींवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि मत्स्यपालन संस्थेला योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी संस्थेचे सदस्य ओमप्रकाश वाघधारे, दिनेश खेडकर, सचिन दूधपचारे यांच्यासह इतर सभासदांनी प्रशासनाकडे केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *