झिंगानूरची वीज लाईन बनली शाप!
अहेरीतील लोहा अन् कल्गेड गावे पाच दिवसांपासून अंधारात
अहेरी (गडचिरोली) : तालुक्यातील दुर्गम व सुदूर भागात वसलेली लोहा आणि कल्गेड ही गावे गेल्या पाच दिवसांपासून पूर्णपणे अंधारात चाचपडत असून, महावितरणच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सततच्या वीज खंडिततेमुळे आणि पावसाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी निर्माण होणाऱ्या हिंस्त्र वन्यजीव, साप व विंचवांच्या धोक्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहा आणि कल्गेड या गावांना सिरोंचा तालुक्यातील बामणी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या झिंगानूर वीज वाहिनीवरून वीज पुरवठा केला जातो. मात्र, झिंगानूरवरून येणाऱ्या या लाईनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने या भागात वीज जाणे नित्यनियमाचेच झाले आहे. यावेळी ही समस्या अधिकच गंभीर बनली असून, सलग ५ दिवसांपासून वीज पुरवठा ठप्प आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असून, अभ्यासात मोठा व्यत्यय येत आहे. शिवाय, मोबाईल चार्जिंग, पिण्याच्या पाण्याची सोय आणि दैनंदिन कामे खोळंबल्याने नागरिकांचा आक्रोश अनावर झाला आहे.
हे दोन्ही गावे घनदाट जंगल परिसरात असल्याने रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. अशा परिस्थितीत वीज नसल्याने शेतात किंवा बाहेर पडणे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोहा आणि कल्गेडची वीज लाईन झिंगानूरऐवजी जिम्मलगट्टा उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या येलाराम गावातून जोडण्यात यावी, अशी रास्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येलाराम परिसरात वीज पुरवठा नियमित राहत असल्याने तिथून लाईन जोडल्यास हा प्रश्न कायमचा सुटू शकतो. महावितरणने याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करावा आणि लाईन बदलण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


