‘कागदावरचा विकास नको, कामात पारदर्शकता दाखवा’
इंजोरीच्या आढावा सभेत झोपलेल्या प्रशासनाला अध्यक्षांचा चाबूक!
अर्जुनी-मोरगाव : बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी इंजोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित आढावा सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी कामचुकार अधिकाऱ्यांची आणि कंत्राटदारांची चांगलीच झाडाझडती घेतली. “कागदावरील बोगस अहवाल दाखवून जनतेची दिशाभूल करू नका; प्रत्यक्षात जमिनीवर विकास दिसला पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका घेत भेंडारकर यांनी जलजीवन मिशन, आरोग्य, पशुसंवर्धन आणि ‘उमेद’ अभियानातील भोंगळ कारभारावर प्रश्नांची सरबत्ती करत प्रशासनाला चांगलेच हादरवून सोडले.
इंजोरी येथील या वादळी बैठकीत शिक्षण, पंचायत, महिला व बालकल्याण, आरोग्य, कृषी, जलजीवन, पशुसंवर्धन, बांधकाम आणि वन विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर अध्यक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला. कंत्राटदारांशी संगनमत करून स्थानिक लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवत चालवलेला मनमानी कारभार तात्काळ थांबवून कामांमध्ये पारदर्शकता आणण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले. तसेच, लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना न देता लसीकरण मोहीम राबवल्याबद्दल आरोग्य विभागाची खरडपट्टी काढण्यात आली.
पशुसंवर्धन विभागाच्या आढाव्यात कंत्राटदारांमार्फत होणाऱ्या निकृष्ट जनावरांच्या पुरवठ्यामुळे मूळ पात्र पशुपालक व गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याच्या थेट तक्रारी नागरिकांनी मांडल्या. यावर अध्यक्षांनी, “योजना केवळ कागदावर राबवून निधी लाटू नका, खऱ्या गरजवंतांपर्यंत लाभ पोहोचलाच पाहिजे,” असा सज्जड दम भरला. याशिवाय, ‘उमेद’ अभियानातील गैरप्रकार आणि पांदण रस्त्यांच्या कामांतील त्रुटींवर कठोर चौकशीचे आदेश देण्यात आले. या आढावा सभेला पं.स. सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, प्रकल्प संचालक प्रमिला जाखडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, शिक्षणाधिकारी पवन खंडारे, गटविकास अधिकारी पल्लवी बाडेकर, DHO डॉ. अभिजित गोल्हार, कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत, प्रकाश ताकसांडे यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी, सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे निष्काळजी अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


