बालकांसंबंधित कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला
महिला व बाल विकास विभागाचा घेतला आढावा
गोंदिया : जिल्ह्यातील बालकांवर होत असलेले अन्याय, अत्याचार, रोखण्यासाठी बालकांसंबंधित काम करणाऱ्या सर्व शासकिय व अशासकिय यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी संवेदनशिलपणे आणि तत्परतेने करावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या मिशन वात्सल्य योजनेंतर्गत जिल्हा बाल संरक्षण समिती, बाल कल्याण समिती, चाईल्ड हेल्प लाईन 1098, प्रायोजकत्व योजना आणि जिल्हा तपासणी समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत ते बोलत होते. सभेला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, पोलीस निरीक्षक नंदिनी चानपुरकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मनोवैज्ञानिक विभागाच्या डॉ.स्नेहा शर्मा व बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष देवका खोब्रागडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री. मुल्ला म्हणाले, बालकांवरील लैंगिक अपराधाचे गुन्हे, अवैद्य दत्तक प्रकरण, बालविवाह आढळून येत असल्यास त्यावर वेळीच आळा घालण्यासाठी बेकायादेशिर प्रकरणात सहकार्य करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावे, तसेच चाईल्ड हेल्प लाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. समाजात बालकांविषयी आदर आणि नैतिकता निर्माण करण्याची तसेच समाजात रुढ असलेल्या अनिष्ठ प्रथा नष्ट करण्याची प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले. मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत बालकांचे अधिकार अबाधित ठेवून काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना संस्थेत न ठेवता कुटूंबातच ठेवून संस्थाबाह्य योजना उपलब्ध करुन देण्यात आल्याचे प्रास्ताविकात सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण समिती चाईल्ड हेल्प लाईन 1098, प्रायोजकत्व योजना आणि जिल्हा तपासणी समितीचा आढावा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी दिला. तर बाल कल्याण समितीचा आढावा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष देवका खोब्रागडे यांनी दिला. दिवसेंदिवस बालकांवरील लैंगिक अपराधाचे प्रमाण वाढत असून ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तालुकास्तर, ग्राम स्तरावर आणि शाळा- महाविद्यालयात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दोन अवैद्य दत्तक विधान प्रकियेत संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले. सन 2025 मध्ये एकूण 10 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले असून बालविवाहात अडकलेल्या बालीकांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हयात 3388 बालकांना बालसंगोपण योजनेचा लाभ तसेच प्रायोजकत्व योजनेअंतर्गत 467 बालकांना लाभ देण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्हयात शासकिय मुलांचे निरिक्षणगृह बालगृह आणि विशेष दत्तक संस्था आसरा शिशुगृह असून त्यामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालके प्रवेशित आहेत. जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यात बालविवाहमुक्त भारत मोहिमेअंतर्गत ‘आपला संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याकरीता संपूर्ण जिल्ह्यात स्वाक्षरी अभियान, पथनाटय आणि चित्ररथ जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे मार्गदर्शनात करण्यात आलेले आहे. अशी माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला विनोदकुमार माने, ज्ञानेश्वर पटले, अनिल बांबोळे, अधिक्षीका मनिषा आंबेडारे, बाल कल्याण समितीच्या सदस्य जयश्री कापगते, अलका बोकडे, वर्षा हलमारे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी मुकेश पटले, रविद्र टेंभुर्णे (प्रकल्प समन्वयक) मनिषा चौधरी, मनिषा मोहुर्ले, नरेश लांजेवार, भागवत सुर्यवंशी, रुपेश चुंडूके, धर्मेद्र भेलावे, पुनेश नाकाडे, चाईल्ड हेल्पलाईनच्या पुजा डोंगरे, अजय खोब्रागडे, आनंद रामटेके उपस्थित होते.

