नागरा येथील प्राचीन शिवमंदिर परिसरातील भव्य शेड भाविकांसाठी ठरणार वरदान!
श्रावण महिना व महाशिवरात्रीला पूजेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार; मंदिर परिसराचे सुशोभीकरण
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नातून ४० लाखांच्या निधीतून ५००० फूट आधुनिक शेडची उभारणी
गोंदिया: श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नागरा येथील ऐतिहासिक व प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी तसेच पूजा-हवनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसाठी भव्य व अत्याधुनिक शेडची उभारणी करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात दूरवरून येणाऱ्या भाविकांची ऊन-पावसापासून सुरक्षा व्हावी आणि पूजेदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी हा शेड अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर ठरणार असल्याची माहिती माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली.
नागरा हे मध्य भारतातील एक प्रमुख व जागृत तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या प्राचीन शिवमंदिराच्या दर्शनासाठी दरवर्षी श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला लाखो भाविकांची रीघ लागते. भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंदिर परिसराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यांच्याच प्रयत्नातून वर्ष २०२४ मध्ये शासनाकडून ४० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ वास्तुविशारदांचा (आर्किटेक्ट) सल्ला घेऊन ५ हजार चौरस फुटांच्या भव्य व आधुनिक डिझाइनच्या शेडचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; २ कोटींतून झाली मूलभूत कामे
नागरा मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे राबवण्यात आली आहेत. सन २०१८ मध्ये तत्कालीन शासनाने नागरा मंदिर परिसराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा अधिकृत दर्जा दिला होता. या दर्जांतर्गत शासनाकडून तब्बल २ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून मंदिर परिसरात भाविकांसाठी प्रशस्त भक्त निवास, स्वच्छतागृह, सिमेंट व डांबरी रस्ते, तसेच २४ तास पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
तलावाचे सुशोभीकरण व पेव्हिंग ब्लॉकचे काम पूर्ण!
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) सहकार्यातून नागरा येथील ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, मंदिराभोवती आकर्षक पेव्हिंग ब्लॉक रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. आधुनिक शेडच्या उभारणीमुळे आता श्रावणातील धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि महाप्रसादाचे वाटप अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे शक्य होणार आहे.

