LatestNewsगोंदियाविदर्भ

माजी सैनिकाकडून ५० हजारांची लाच मागणारी महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

तहसील कार्यालयात खळबळ; जमिनीची नोंद नावावर करण्यासाठी मागितली होती लाच, १० हजारांचा हप्ता घेताना रंगेहात अटक
गोंदिया (प्रतिनिधी) :
शासनाकडून मिळालेली जमीन नावावर करून देण्यासाठी एका ६२ वर्षीय माजी सैनिकाकडून तब्बल ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना गोंदिया तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही धडक कारवाई बुधवार, १७ जून रोजी करण्यात आली. शालू कमलेश कावळे (वय ३८, वर्ग-३ कर्मचारी) असे या लाचखोर महिला कर्मचाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे गोंदिया महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असून ते भारतीय नौदलाचे माजी सैनिक आहेत. तसेच, ते पोलीस खात्यातून वरिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. माजी सैनिक असल्याने शासनाकडून त्यांना गोंदिया तालुक्यातील ग्राम तेढवा येथील सिलिंगची जमीन (भूमापन क्रमांक १७४) मिळाली आहे. ‘महाराष्ट्र कृषी जमीन (कमाल मर्यादा) कायदा १९६१’ अंतर्गत ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी त्यांनी गोंदियाच्या तहसीलदारांकडे अर्ज केला होता.
या अर्जावर पुढील कार्यवाही करण्यासाठी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक शालू कावळे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट गोंदिया एसीबी कार्यालय गाठून १६ जून २०२६ रोजी तक्रार दाखल केली.
एसीबीने या तक्रारीची तत्काळ पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपी शालू कावळे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, आगाऊ रक्कम (ॲडव्हान्स) म्हणून १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. उर्वरित ४० हजार रुपये काम पूर्ण झाल्यानंतर घेण्याचे ठरले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने १७ जून रोजी सापळा रचला आणि तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शालू कावळे यांना रंगेहात पकडले.
मोबाईल जप्त; घरझडती सुरू
कारवाईदरम्यान आरोपीची अंगझडती घेतली असता लाचेचे १० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. तसेच, त्यांच्या ताब्यातील विवो (Vivo) कंपनीचा जांभळ्या रंगाचा जुना मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला एसीबीने ताब्यात घेतले आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोंदिया एसीबीचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अरविंद राऊत (तपास अधिकारी), सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, पोलीस नाईक संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, दीपक बाटबर्वे आणि महिला पोलीस शिपाई रोहिणी डांगे यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे. लाच मागणारा स्वतः किंवा एजंटमार्फत पैशांची मागणी करत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), तिरोडा रिंग रोड, रेल्वे चौकीजवळ, गोंदिया येथे संपर्क साधावा.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *