‘आज पाणी वाचवले नाही, तर उद्या एक लिटर पाणी १०० रुपयांना प्यावे लागेल!’ : आमदार विनोद अग्रवाल
चुलोद येथे जलपूजन व वृक्षारोपण; ग्रामस्थांना जलसंवर्धन, सेंद्रिय शेती अन् हरित गाव निर्मितीची दिली शपथ
गोंदिया (२० ऑगस्ट): “भारत नैसर्गिक संपत्तीने समृद्ध देश आहे, परंतु आधुनिकतेच्या शर्यतीत पाणी, जंगल आणि जमीन यांसारख्या नैसर्गिक घटकांशी खेळ केला जात आहे. पूर्वजांनी सिंचन व पाणीपुरवठ्यासाठी तलाव बांधले, मात्र आपल्या दुर्लक्षामुळे अनेक जलस्रोत नामशेष होण्याच्या मार्गावर असून भूजल पातळी खालावत आहे. आज पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण केले नाही, तर भविष्यातील पिढ्यांना एक लिटर पाण्यासाठी १०० रुपये मोजावे लागतील,” असा गंभीर इशारा गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी दिला.
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान राबविल्या जाणाऱ्या जलसंधारण सप्ताह अभियानांतर्गत आणि माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त चुलोद (ता. गोंदिया) येथे जलजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी गावातील तलावात विधिवत जलपूजन करून वृक्षारोपण केले.
रासायनिक खते टाळून सेंद्रिय शेतीकडे वळा
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार अग्रवाल यांनी शेती पद्धतीत बदलाची गरज व्यक्त केली. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता धोक्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे आणि भातासोबतच नगदी पिकांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व ग्रामस्थांना जलसंवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता आणि गाव सुजलाम-सुफलाम करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्या ममताताई वाढवे, पंचायत समिती सदस्य कनीराम तावाडे, चुलोदच्या सरपंच मायाबाई बोरकर, एपीएमसी संचालक राधाकृष्ण ठाकूर, गोविंदभाऊ ठाकूर, मृद व जलसंधारण विभागाचे उपअभियंता राहुलकर, तलाठी लांजे, विजय ठाकूर, पोलीस पाटील कविता भालाधरे, संजय बिसेन यांच्यासह गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘तलावातील गाळ शेतांसाठी वरदान’
चुलोद येथील तलावाचे उदाहरण देताना आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, “दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला हा तलाव खोलीकरण आणि जलसंधारणाच्या कामांमुळे पुन्हा जिवंत झाला आहे. तलावातून काढलेला गाळ निरुपयोगी नसून तो शेतात पसरवल्यास जमिनीची सुपिकता वाढून पीक उत्पादनात मोठी वाढ होते.”


