LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

कळमना परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! क्राईम ब्रांचची धाड

महिला दलाल जेरबंद, अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका!
नागपूर (प्रतिनिधी):
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा रोडवर गुप्तपणे सुरू असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर क्राईम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) अचानक धाड टाकून या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत देह व्यापार चालवणाऱ्या महिला दल्लाला रंगेहात अटक करण्यात आली असून, तिच्या तावडीतून एक अल्पवयीन मुलगी आणि एका युवतीची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्लॉट नं. १०४, भगत नगर, भरतवाडा रोड, कळमना येथील रहिवासी लक्ष्मी किशोर कुन्हे (वय ३६) ही महिला स्वतःच्या घरी ग्राहकांना बोलावून देह व्यापार चालवत असल्याची पक्की माहिती गुप्तहेरामार्फत क्राईम ब्रांचला मिळाली होती. मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २:२५ वाजता एसएसबीच्या पथकाने पंचांसमक्ष या घरावर अचानक छापा टाकला. यावेळी लक्ष्मी कुन्हे ही स्वतःच्या फायद्यासाठी मुलींकडून देह व्यापार करून घेताना रंगेहात सापडली.
कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून १,५०० रुपयांची रोकड, मोबाईल व इतर साहित्यासह एकूण १६,५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात आरोपी लक्ष्मी कुन्हे हिच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १४३(२)(३) आणि अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पीआय दर्शन पाटील, एपीआय शिवाजी ननावरे, पोलीस अंमलदार लक्ष्मण चौरे, प्रकाश माथनकर, किशोर ठाकरे, नितीन वासने, महिला पोलीस अंमलदार लता गवई, आरती चव्हाण, पूनम शेंडे आणि कमलेश क्षीरसागर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढे आरोपीला पुढील कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *