LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

आई ओरडली… पोलीस आले, अन् हल्लेखोर पळाले! भंडारा शहरातील संत जगनाडे चौकात थरार

दिवसाढवळ्या तरुणावर कोयता व तलवारीने हल्ला; आईच्या प्रसंगावधानाने वाचला मुलाचा जीव
भंडारा:
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील संत जगनाडे चौकात दिवसाढवळ्या रक्तांजित थरार घडला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी आईसमोरच तिच्या मुलावर व त्याच्या मित्रावर कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला केला. “पोलीस आले, पोलीस आले!” अशी आईने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानाने व ओरडण्याने हल्लेखोरांनी तिथून पळ काढला आणि तरुणाचा जीव वाचला. या घटनेत अमित चोपकर व विश्वा गाते हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष वॉर्डात राहणारा अमित चोपकर हा १४ ऑगस्ट रोजी दुपारी जेवण करून नागपूरला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. त्याची आई छाया चोपकर काही सामान आणण्यासाठी संत जगनाडे चौकातील विघ्नहर्ता हॉटेल समोर गेली असता, तिथे अमित व त्याचा मित्र विश्वा गाते उभे होते. त्याचवेळी रोशन भोंगाडे नावाचा युवक तिथे आला आणि त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला.
काही वेळातच रोशन भोंगाडे, रोहित भोंगाडे आणि त्यांचे ६ ते ८ मित्र मोटारसायकलने तिथे पोहोचले. त्यांच्या हातात धारदार कोयते आणि तलवारी होत्या. त्यांनी थेट अमित व विश्वावर जीवघेणा हल्ला चढवला. रक्तबंबाळ अवस्थेत अमित जीव वाचवण्यासाठी पळत एका झोपडीत/घरात शिरला, तर विश्वा दुसरीकडे पळाला. आई छाया चोपकर हल्लेखोरांपुढे मुलाला सोडण्याची गयावया करत होती. “आम्ही याला जिवंत सोडत नाही” असे म्हणत हल्लेखोर अमित लपलेल्या घराचे दरवाजे लाथा मारून तोडण्याचा प्रयत्न करत होते.
……………….
आईची चलाखी अन् पोलिसांची धाव:
परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून आईने मोठ्याने, “पोलीस आले, पोलीस आले!” अशी आरडाओरड सुरू केली. बाजूने जाणाऱ्या एका वाहनाच्या आवाजामुळे पोलीसच आले असे वाटून घाबरलेले हल्लेखोर तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.
भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल:
घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी अमितला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. छाया चोपकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहित भोंगाडे, रोशन भोंगाडे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, १८९(४), १९०, १९१(२), १९१(३) आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *