धावत्या एसटी बसचे चाक निखळले; २८ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले!
अहेरी-सिरोंचा मार्गावरील मेढाराम जवळील घटना; चालकाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात
अहेरी (गडचिरोली): अहेरी आगारातून सिरोंचाकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळून सुमारे १०० फूट अंतरावर शेतात जाऊन पडल्याची थरारक घटना बुधवारी मेढाराम गावाजवळ घडली. चालकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असून बसमधील २८ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
शंभर फूट अंतरावर जाऊन पडले चाक:
मिळालेल्या माहितीनुसार, MH-40 AQ-6125 क्रमांकाची एसटी बस अहेरी आगारातून सिरोंचाकडे रवाना झाली होती. बस मेढाराम गावाजवळ पोहोचली असता अचानक बसच्या मागील बाजूचे चाक निखळून वेगळे झाले. हे चाक बसपासून सुमारे १०० फूट अंतरावर जाऊन रस्त्यालगतच्या शेतात पडले.
चाक निखळल्याचे चालकाच्या तात्काळ लक्षात येताच त्यांनी अत्यंत संयम व प्रसंगावधान राखत बसवरील नियंत्रण कायम ठेवले आणि बस सुरक्षितपणे थांबवली. त्यामुळे बस उलटण्याचा किंवा रस्त्यावरून घसरून मोठा अपघात होण्याचा धोका टळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सर्व प्रवासी सुरक्षित:
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून बसमधील सर्व २८ प्रवासी सुरक्षित आहेत. धावत्या बसचे चाक निखळून १०० फूट लांब जाणे यावरून घटनेचे गांभीर्य लक्षात येते. रस्त्यावर मोठी वर्दळ नसल्याने अनर्थ टळला. घटनेनंतर प्रवाशांना सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी हलवण्यात आले. चालकाच्या समयसूचकतेमुळे २८ प्रवाशी सुखरूप वाचल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

