LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

३० गोवंशांची सुटका; चिचगड पोलिसांकडून ट्रकासह १३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

ककोडी-चिचगड मार्गावरील वांढरा फाट्याजवळ मध्यरात्री सापळा छत्तीसगडमधून नागपूरकडे चालली होती तस्करी

देवरी (गोंदिया ) : छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात ककोडी-चिचगड मार्गे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ३० गोवंशांची चिचगड पोलिसांनी सापळा रचून सुटका केली. मौजा डोंगरगाव लगतच्या वांढरा फाटा परिसरात करण्यात आलेल्या या धडक कारवाईत १० लाखांचा ट्रक आणि ३ लाख ६० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे आंतरराज्यीय गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहे.सविस्तर वृत्त असे की, बालोद (छत्तीसगड) येथून एका ट्रकमध्ये गोवंशाची अत्यंत निर्दयतेने कोंबून नागपूरच्या दिशेने चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची पक्की गोपनीय माहिती चिचगड पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता डोंगरगाव शिवारातील वांढरा फाटा येथे नाकाबंदी करून सापळा लावला. दरम्यान, ककोडीच्या दिशेने संशयास्पद वेगाने येणारा ट्रक (क्रमांक सीजी १५/सीझेड ८१२३) पोलिसांना दिसताच त्यांनी तो अडविला.पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत ट्रकची कसून तपासणी केली असता, त्यात दाटीवाटीने व क्रूरपणे दोरीने बांधून ठेवलेली ३० गोवंशांची जनावरे आढळून आली. त्यांच्यासाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी तत्काळ ट्रक ताब्यात घेत सर्व जनावरांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ६० हजार रुपयांची जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या तस्करीचे मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.सदर यशस्वी कारवाई चिचगडचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस हवालदार शहारे, शिरपूरकर, पदे आणि सलामे यांनी पार पाडली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *