खैरी शिवारात बिबट्याचा थरार! गोठ्यात घुसून दोन वासरांसह चार वगारींची रक्ताळलेली शिकार
बोर व्याघ्र प्रकल्पालगत बिबट्याचा धुमाकूळ
नागपूर : बोर व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या कोंढाळी (ता. काटोल) वनपरिक्षेत्रातील खैरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच रात्रीत थेट गोठ्यात घुसून दोन कालवडी अन् चार लहान वगारींचा फडशा पाडला. मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे बळीराजा चांगलाच दहशतीखाली आला आहे.
खैरी येथील शेतकरी व पशुपालक युवराज नागोराव पराडकर यांनी आपल्या शेतातच गुरांचा गोठा उभारला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी सोमवारी (दि. १०) सायंकाळी ५५ हून अधिक जनावरे गोठ्यात सुरक्षित बांधली होती. मात्र, मंगळवारी पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने थेट गोठ्यात शिरकाव केला. तेथे बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढवत बिबट्याने दोन लहान कालवडी आणि चार लहान वगारींना जागीच ठार केले. सकाळी युवराज पराडकर शेतात गेले असता, गोठ्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जनावरांचा सडा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
या घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांच्या सूचनेनुसार क्षेत्र सहाय्यक एस. व्ही. परेकर, वनरक्षक एन. व्ही. कराड, शिर्मी, तसेच वन कर्मचारी किशोर कुसळकर व पुंडलिक सरोदे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. विशेष म्हणजे, याच शिवारातील खुशबू विकास कुहिाके यांच्या शेतातील जनावरांवरही बिबट्याने डल्ला मारला होता. हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सतत होणाऱ्या या प्राणघातक हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाने तात्काळ या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी आणि रात्रीच्या वेळी वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

