रेल्वे लोहमार्ग पोलीस दलात मनीषा कुंभरेची निवड
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आदिवासी कन्येची गरुडझेप
नवेगावबांध : कठोर परिश्रम आणि ध्येयावर असलेली अढळ निष्ठा असेल तर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडे येथील मनीषा कुंभरे हिने सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत गरिबीवर मात करत मनीषाने मुंबई रेल्वे लोहमार्ग पोलीस दलात पोलीस पदाला गवसणी घातली आहे. एका आदिवासी कन्येने आपल्या जिद्दीच्या जोरावर घेतलेल्या या गरुडझेपेमुळे संपूर्ण परिसरात तिचे कौतुक होत असून अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मनीषा ही एका साध्या आदिवासी कुटुंबातील मुलगी असून तिचे आई-वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. एम.कॉम.पर्यंत उच्च शिक्षण घेतलेल्या मनीषाला लहानपणापासूनच खाकी वर्दीचे आकर्षण होते. विशेष म्हणजे, २०२४ च्या पोलीस भरतीत तिला थोड्या थोडक्या गुणांनी अपयश आले होते. मात्र या अपयशाने खचून न जाता तिने दुप्पट वेगाने आणि जिद्दीने तयारी सुरू केली.
मनीषाने आपल्या अभ्यासाचे चोख नियोजन केले होते. नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या अभ्यासिकेत बसून अभ्यास केला. तिच्या या खडतर प्रवासात नवेगावबांधच्या तत्कालीन ठाणेदार योगिता चाफले आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई पौर्णिमा, वडील तुळशीदास आणि भाऊ दक्षत यांनी तिला प्रतिकूल परिस्थितीतही सतत प्रोत्साहन दिले. कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते, असा संदेश मनीषाने दिला. आपल्या यशातून मनीषाने ग्रामीण भागातील आणि विशेषतः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

