गोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

दिल्लीत गडकरी-पटेल-जैन यांची हाय व्होल्टेज बैठक! गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील महामार्ग, पूल अन् ROB कामांना मिळणार ‘ग्रीन सिग्नल’!

प्रलंबित विकासकामांचा मार्ग मोकळा : नितीन गडकरींचे कामांना गती देण्याचे आश्वासन!
गोंदिया :
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते, रेल्वे उड्डाणपूल (ROB), उड्डाणपूल आणि महामार्गांच्या रुंदीकरणाच्या कामांना आता थेट केंद्रातून मोठा ‘स्पीड’ मिळणार आहे. आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांनी एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक घेतली. दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर वाहतूक समस्या, रखडलेले प्रकल्प आणि नवीन विकासकामांबाबत या बैठकीत विस्तृत व रोखठोक चर्चा करण्यात आली.
भंडारा आणि गोंदियाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित सुविधा मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांचे मजबुतीकरण, उड्डाणपुलांचे थबकलेले बांधकाम आणि रेल्वे ओव्हरब्रिजच्या (ROB) प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची आक्रमक मागणी यावेळी नेत्यांनी लावून धरली. या बैठकीला तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी विशेष उपस्थिती लावून तुमसर-मोहाडी भागातील प्रलंबित रस्तेकामांकडे लक्ष वेधले, तर रस्ते वाहतूक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या वेळी हजर होते.
या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३, २८७ आणि ७५३ वरील अनेक कळीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये खैरलांजी-खापा, भंडारा शहरातील शास्त्री चौक ते त्रिमूर्ती चौक, शीतला माता मंदिर ते रेल्वे समतल क्रॉसिंगपर्यंतचा सिमेंट काँक्रीट रस्ता, भंडारा-तुमसर-बपेरा मार्गाचे रुंदीकरण, खापा चौक व जाम येथील उड्डाणपूल, तसेच खैरलांजी-तुमसर-मोहाडी-भंडारा आणि तिरोडा-सालई खुर्द-मनसर मार्गावरील चारपदरीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ व ७५३ वरील आमगाव-देवरी आणि गोंदिया-आमगाव मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल, गोंदिया पूर्व बायपासवरील अतिरिक्त ROB, गोंदिया-तिरोडा मार्गावरील बालाघाट टी-पॉईंट व काचेवाणी येथील ROB, जिल्हाधिकारी कार्यालय ते खमारी चारपदरी रस्ता आणि कोहमारा-गोंदिया मार्गाचे चौपदरीकरण यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
खासदार प्रफुल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांनी मांडलेल्या या सर्व समस्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत सकारात्मकता दर्शवली. दोन्ही जिल्ह्यांतील विकासकामांधील तांत्रिक त्रुटी आणि अडचणी तात्काळ दूर करून अपूर्ण कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन गडकरी यांनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांचे रस्ते-वाहतुकीचे चित्र पूर्णपणे बदलणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *