LatestNewsगोंदियाविदर्भ

तिरोडा-तुमसर मार्गावर भीषण अपघात; मलपुरीतील दोन तरुणांचा करुण अंत

कार-दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत एकाचा जागीच, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू
तिरोडा :
तिरोडा-तुमसर मार्गावर बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अत्यंत भयंकर अपघातात मलपुरी येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे मलपुरी गावात दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सौरभ उमेश बघेले (वय २५) आणि शिवम चुन्नीलाल अंबुले (वय २५, दोन्ही रा. मलपुरी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोन्ही तरुण दुचाकीने प्रवास करत होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर (क्रमांक MH 35 AG 2785) कारसोबत त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, सौरभ बघेले याचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र शिवम अंबुले हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता.
गंभीर अवस्थेत असलेल्या शिवमला उपचारासाठी तातडीने गोंदिया येथील रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, काळाने त्याच्यावरही झडप घातली आणि वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर अपघातग्रस्त कार रस्त्याच्या कडेला आढळून आली. कारचा पुढील डावा भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसून आले, ज्यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि तिरोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) तिरोडा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिरोडा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत. अवघ्या पंचविशीतील दोन तरुण आणि उमद्या मुलांचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने मलपुरी गावावर शोककळा पसरली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *