अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांवर काळाचा घाला! दुचाकी झाडाला धडकली; दोघेही तरुण मित्र ठार
शैक्षणिक भेट आटोपून परतताना अपघात; सोंडद आणि अर्जुनी मोरगाववर पसरली शोककळा
साकोली : तालुक्यातील पळसपाणी-चांदोरी मार्गावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. कॉलेजची शैक्षणिक भेट आटोपून घराकडे परतणाऱ्या दोन हुशार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याशेजारील झाडावर प्रचंड वेगाने आदळली. या भीषण अपघातात दोन्ही विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला. या घटनेमुळे सोंडद आणि अर्जुनी मोरगाव परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. कुणाल गोटफोडे (रा. सोंडद) आणि महेश कामशेलवार (रा. अर्जुनी मोरगाव) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुणाल गोटफोडे आणि महेश कामशेलवार हे दोघेही कारंजेकर इंजिनिअरिंग कॉलेज, साकोली येथे अनुक्रमे द्वितीय व तृतीय वर्षात सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. गुरुवारी त्यांच्या कॉलेजतर्फे पालोरा येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ही शैक्षणिक भेट आटोपून दोघेही आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३६ एएन ६४९३) साकोलीकडे परत येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, तुमसर-साकोली मार्गावरील पळसपाणी येथील सुंदरटोला रस्त्यावर आले असता, अचानक त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव असलेली दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडावर जाऊन जबर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कुणाल गोटफोडे याचा जागीच थरारक मृत्यू झाला, तर महेश कामशेलवार हा गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शी निखिल मेश्राम यांनी तत्परता दाखवत तात्काळ ‘१०८’ रुग्णवाहिका बोलावून पोलीस प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महेशला गंभीर अवस्थेत साकोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली. पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कुणाल आणि महेश यांच्या कुटुंबीयांनी साकोली उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. आपल्या तरुण आणि हुशार मुलांचे मृतदेह पाहताच आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसरातील उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दोन तरुण मुलांचा असा अकाली अंत झाल्याने सोंडद व अर्जुनी मोरगावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस करत आहेत.

