LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

घोटी येथे अवैध गोमांस विक्री करणाऱ्याला रंगेहात पकडले!

डुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई;
४० किलो मांसासह मुद्देमाल जप्त
सडक अर्जुनी (गोंदिया) :
गुप्त माहितीच्या आधारे डुग्गीपार पोलिसांनी सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी (डव्वा) येथे धडक छापा टाकून बेकायदेशीरपणे गोमांस विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ४० किलो अवैध गोमांस, वजनाचा तराजू आणि इतर साहित्यासह एकूण ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी डुग्गीपार पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली होती की, घोटी (डव्वा) येथील रहिवासी प्रकाश तुलशीराम सोनवाने हा आपल्या राहत्या घरून छुप्या मार्गाने अवैध गोमांस विक्री करत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता पथक तयार करून संशयिताच्या घरावर छापा टाकला. पोलीस पथकाने पाहणी केली असता, घराला लागून असलेल्या एका खोलीतून बेकायदेशीरपणे मांसाची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तात्काळ त्या खोलीतून सुमारे ४० किलो वजनाचे कापलेले मांस जप्त केले.

मांसासह तराजू व साहित्य जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मांसाची किंमत १५० रुपये प्रति किलोप्रमाणे ६,००० रुपये आणि घटनास्थळावरून जप्त केलेला वजनाचा तराजू व इतर साहित्याची किंमत ९०० रुपये, असा एकूण ६,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी प्रकाश तुलशीराम सोनवाने याच्याविरोधात डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
सदर यशस्वी कारवाई डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शेख, राकेश राऊत, मुले, देशमुख आणि निखिल मेश्राम यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *