LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

तिडका ते गवळी पूल मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधींच्या घोर दुर्लक्षाने नागरिक अन् शेतकरी हैराण!

१ किमीच्या रस्त्यावर ३ ते ४ मीटरचे खड्डे!
सडक अर्जुनी (गोंदिया):
सडक अर्जुनी तालुक्यातील तिडका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘तिडका ते गवळी पूल’ या १ किलोमीटर अंतराच्या डांबरी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे वाहनचालकांना खड्ड्यातूनच रस्ता शोधत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दुर्लक्षामुळे स्थानिक शेतकरी आणि प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

हा मार्ग केवळ तिडका गावापुरता मर्यादित नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी आहेत. त्यामुळे तिडका, फुटाळा, सावंगी, बाबनी, सडक अर्जुनी आणि कोदामढी येथील शेकडो शेतकऱ्यांना रात्रंदिवस याच मार्गाने शेतात ये-जा करावी लागते. याशिवाय सौंदडवरून कोहमारा मार्गे सडक अर्जुनी जाण्यासाठी तब्बल ८ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, तर गवळी पूल-तिडका मार्गे हेच अंतर अवघे ४ किलोमीटर पडते. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत करण्यासाठी या भागातील हजारो नागरिक याच १ किलोमीटरच्या शॉर्टकट रस्त्याचा दैनंदिन वापर करतात.प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने झोपेचे सोंग सोडून या तिडका ते गवळी पूल १ किलोमीटर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे किंवा किमान खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, अशी आक्रमक मागणी तिडका, सावंगी, फुटाळा परिसरातील संतप्त नागरिकांनी केली आहे.
१० वर्षांपासून डागडुजी नाही; पावसाळ्यात रस्त्यालाच आले नाल्याचे स्वरूप!
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १० वर्षांपूर्वी या डांबरी रस्त्याचे निर्माण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आजतागायत या रस्त्याची साधी डागडुजी (रिपेअरिंग) किंवा ठिगळ लाावण्याचे कामही संबंधित विभागाकडून करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, पावसाळ्यात या रस्त्याची उंची दोन्ही बाजूंच्या शेतजमिनीपेक्षा १ ते २ फूट खाली असल्याने शेतातील पाण्याचा निचरा थेट रस्त्यावरूनच होतो. पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्यावर तब्बल ३ ते ४ मीटरचे भलामोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे, हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वार खड्ड्यांचा अंदाज न आल्याने घसरून जखमी होत आहेत.
भाजपच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांवर नागरिकांचा रोष!
तिडका हे गाव सौंदड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात येते. या भागात भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रतिनिधी निवडून आलेले असतानाही, गेल्या १० वर्षांपासून एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याकडे त्यांचे लक्ष का जात नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ‘निवडणुकीपुरते मते मागायला येणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गायब झाले आहेत?’ अशी जोरदार चर्चा सध्या या परिसरातील गावकऱ्यांमध्ये रंगत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *