बल्लारपुरात मद्यधुंद चालकाचा थरार; बेफाम बोलेरोने तिघांना उडवले, मेडिकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू!
चंद्रपूर : बल्लारपूर-बामणी मार्गावर दारूच्या नशेत बेफाम झालेल्या एका बोलेरो पिकअप चालकाने रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घालत भयानक अपघात घडवून आणला. भरधाव बोलेरोने (MH-32-Q-2595) आधी एक कार, गाय आणि मोपेडला धडक दिली. या भीषण अपघातात बल्लारपूर येथील मेडिकल चालक अरशद खान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दि. १९ ऑगस्टच्या रात्री अरशद खान हे बल्लारशाह येथील आपले मेडिकलचे दुकान बंद करून मोपेडने बामणीकडे जात होते. दरम्यान, मागून आलेल्या भरधाव बोलेरो चालकाने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अरशद खान यांना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बोलेरो चालक दारूच्या नशेत धुंद होता. मोपेडला धडक देण्यापूर्वी त्याने एका कारला व गायीलाही धडक दिली होती.
इतके होऊनही चालकाने वाहनाचा वेग कमी केला नाही. अपघातानंतर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत बेदरकारपणे गाडी पळवत त्याने आणखी तिघांना उडवले. अखेर पुढे असलेल्या एका डिझेल टँकरला बोलेरोची जोरदार धडक बसली. यात बोलेरोचा पुढील भाग चक्काचूर होऊन चालक वाहनातच अडकला आणि या अपघाताचा थरार थांबला. संतप्त नागरिकांनी चालकाला वाहनातून बाहेर काढून चांगलाच चोप दिला. जखमी आरोपी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू असून, बल्लारपूर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
गोंडपिंपरी : पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून पहाटे धावण्याचा सराव करणाऱ्या २८ वर्षीय विठ्ठल सुधाकर मोहूर्ले या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी दि. २० ऑगस्ट रोजी पहाटे धाबा गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर धाबा-गोंडपिंपरी मार्गावर ही हृदयद्रावक घटना घडली.
सकाळी सरावासाठी जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने विठ्ठल यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले असून, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने विठ्ठल यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी शेतमजुरी करत ते पोलीस भरतीची तयारी करत होते. त्यांच्या या अकाली निधनाने मोहूर्ले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. धाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.

