विशेष शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा स्तुत्य उपक्रम!
गोंदिया जिल्हा न्यायालयात भव्य सोहळा; पालक न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चांदवाणी यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पालवरची शाळेला ७५ इंच फ्लॅट पॅनल पॉवर बोर्ड, तर स्व. जमनाबाई निवासी शाळेला एलईडी टीव्हीची भेट
गोंदिया : जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष उपक्रमात पालक न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चांदवाणी यांच्या हस्ते विशेष शाळा आणि मतिमंद मुलांच्या संस्थांना शैक्षणिक व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा सोहळा जिल्हा न्यायालयात पार पडला.
या सामाजिक उपक्रमांतर्गत पालवरची शाळेतील विद्यार्थ्यांना ७५ इंच फ्लॅट पॅनेल पॉवर बोर्ड भेट देण्यात आला. तसेच ‘स्व. जमनाबाई निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा’ (उमरी/सावरटोला, ता. अर्जुनी मोरगाव) यांना एलईडी टीव्ही व मदत साहित्य देण्यात आले. यासोबतच ‘मानवता मतिमंद मुलांची निवासी शाळा’ (खोगरला, आमगाव) येथील विद्यार्थ्यांना गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

न्यायाधीश व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश-१ ए. एस. प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश-२ एम. टी. असीम, जिल्हा न्यायाधीश-४ ए. सी. खुराणा, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. के. सोरते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एन. के. वाळके, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती वाय. के. राऊत, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. व्ही. ढोरे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती एस. व्ही. चरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय गोंदिया व विविध तालुक्यांतील न्यायिक अधिकारी ए. एम. कासीम, श्रीमती एस. ए. शेंडे, श्रीमती एस. के. बिराजदार, व्ही. एच. शेंडे, एस. जी. गुणारी (आमगाव), श्रीमती ए. टी. बनसोड (तिरोडा), एस. अग्रवाल (तिरोडा), श्रीमती पी. एन. कोकाटे (अर्जुनी मोरगाव), श्रीमती पी. एम. काजळे (सडक अर्जुनी), व्ही. एस. मेंढे (देवरी), जिल्हा बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. मंजुलता चतुर्वेदी, सचिव ॲड. नीना दुबे, जिल्हा न्यायालयीन संघटनेचे अध्यक्ष सरोदे, पालवरची शाळेचे शिक्षक बोरसे, स्व. जमनाबाई निवासी मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक नारायण बावनकर व मानवता मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक रोशन बोरकर उपस्थित होते.

अभ्यासातील प्रगतीसाठी साहित्य उपयोगी पडेल: पालक न्यायमूर्ती
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पालक न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चांदवाणी यांनी उपक्रमातील सर्व सहभागी घटकांचे आभार मानले. पालवरची शाळा, स्व. जमनाबाई निवासी शाळा आणि मानवता निवासी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात आलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या अभ्यासातील व शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच न्यायालयाच्या बांधकामाकरिता मदत कार्य अविरत सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा न्यायालयाचे वकील ॲड. बोरीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यकारी सदस्य ॲड. प्रीती तुरकर यांनी मानले. या कार्यक्रमास वकील वर्ग, न्यायाधीश वर्ग, विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदियाचे कर्मचारी व पी.एल.व्ही. असे एकूण २५० ते ३०० जण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

