LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

‘भारत माता की जय’ अन् ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने नागपूर दुमदुमले; ७०० मीटर लांब तिरंग्यासह निघाली भव्य रॅली!

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत क्रांती दिनानिमित्त उपराजधानीत देशप्रेमाचा उत्साह
नागपूर :
केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रविवारी नागपूर शहरात देशभक्तीच्या वातावरणात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. क्रांती दिनाचे औचित्य साधून निघालेल्या या रॅलीत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहरातील चौक अन् रस्ते दुमदुमून गेले होते. रामनगर चौक येथील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून महापौर नीता ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला रवाना केले. रामनगरवरून सुरू झालेली ही रॅली लक्ष्मी भवन चौक मार्गे शंकर नगर चौकात पोहोचली. या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरलेला ७०० मीटर लांब भव्य तिरंगा नागरिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे संपूर्ण मार्गावर दिमाखात फडकत होता.

मान्यवरांची उपस्थिती
या रॅलीत राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. संजय भेंडे, भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, शिक्षण अधिकारी वंदना महाजन, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आणि एनडीएस पथक प्रमुख वीरसेन तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी अन् स्केटिंगची मोहिनी
रॅलीत सर्वात पुढे नागरिक ७०० मीटर लांब तिरंगा हातात धरून चालत होते. त्यानंतर माजी सैनिक, अग्निशमन दलाचे जवान, एनडीएस जवान तसेच वाल्मीकी नगर हिंदी माध्यमिक विद्यालय, विवेकानंद हिंदी माध्यमिक विद्यालय आणि शिवणगाव मराठी विद्यालयाचे विद्यार्थी विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली सांस्कृतिक नृत्ये आणि गुरु तेग बहादूर सिंग साहिब गुरुद्वाराच्या वतीने करण्यात आलेली पारंपरिक शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके विशेष लक्षवेधी ठरली. याशिवाय हातात तिरंगा घेऊन स्केटिंग करणाऱ्या कु. अथांग राजगुरु व कु. उमंग नितनवरे या बालकांनीही उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी दयाशंकर तिवारी यांनी क्रांती दिनाचे महत्त्व पटवून दिले. तरुण पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यात देशसेवेची भावना रुजावी, या उद्देशाने या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *