वेळेत टॅक्स भरा आणि मिळवा आरओचे शुद्ध पाणी मोफत!
भजेपार ग्रामपंचायतीची भन्नाट ऑफर
सालेकसा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि पंचायतराज दिनाचे औचित्य साधून सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि आरोग्यदायी योजना जाहीर केली आहे. ‘माझे कर, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून राबविल्या जाणार्या या योजनेअंतर्गत, वेळेत कर भरणार्या ग्रामस्थांना चक्क ५० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही सूट रोख रकमेऐवजी ‘आरओ’वॉटर एटीएम’ कार्ड रिचार्जच्या स्वरूपात मिळणार असल्याने, कर वसुलीसोबतच नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे.

ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या या योजनेनुसार, वर्ष २०२६-२७ चा संपूर्ण कर एकरकमी भरणार्या खातेदारांना टप्प्याटप्प्याने सवलत दिली जाईल. जर एखाद्या नागरिकाने एप्रिल किंवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत कर भरला, तर त्याला भरलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम पाणी रिचार्ज स्वरूपात परत मिळेल. उदाहरणार्थ, ज्यांचा कर ४ हजार रुपये आहे, त्यांना २ हजार रुपयांचे पाणी रिचार्ज मोफत मिळेल. बाजारभावाप्रमाणे २० रुपये प्रति कॅन या हिशोबाने विचार केल्यास, ४ हजार रुपयांच्या करावर नागरिकांना सुमारे ५ हजार रुपयांचे शुद्ध पाणी मोफत मिळणार आहे. जूनमध्ये कर भरल्यास ४० टक्के, जुलैमध्ये ३० टक्के, ऑगस्टमध्ये २० टक्के आणि सप्टेंबरमध्ये १० टक्के अशी ही सूट कमी होत जाईल.
या अभिनव प्रयोगामुळे ग्रामपंचायतीची १०० टक्के कर वसुली होऊन विकासकामांना गती मिळणार आहे, तर दुसरीकडे शुद्ध पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे गावकर्यांचे आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होणार आहे. सरपंच चंद्रकुमार बहेकार यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, सदस्य रवीशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या उपक्रमापूर्वीपासूनच भजेपार ग्रामपंचायतीने प्लास्टिकमुक्त कार्यक्रमांसाठी, अंत्यविधी प्रसंगी, तसेच शाळा, अंगणवाडी आणि सरकारी कार्यालयांना मोफत शुद्ध पाणी देण्याचा पायंडा पाडला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे भजेपार ग्रामपंचायत जिल्ह्यासाठी एक नवा आदर्श ठरत असून, सर्वत्र या ‘भन्नाट’ कल्पनेचे कौतुक होत आहे.
……………….
‘गावचा विकास आणि नागरिकांचे आरोग्य असा दुहेरी संगम साधण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. नागरिकांनी लवकरात लवकर कर भरून या बंपर सवलतीचा लाभ घ्यावा. गावाचा विकास आणि नागरिकांचे आरोग्य जपण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-चंद्रकुमार बहेकार, सरपंच

