जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याने सरपंच अपात्र!
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पदावरून पायउतार
चुल्हाड (सिहोरा) परिसरातील मोहगाव खदान ग्रामपंचायतीमधील कारवाईने खळबळ
चुल्हाड (भंडारा) : मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने मोहगाव खदान ग्रामपंचायतीच्या सरपंच मालती डडेमल यांना पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी हा निर्णय दिला.
१८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या मोहगाव खदान ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते. सरपंच पदावर मालती डडेमल या निवडून आलेल्या होत्या. अनुसूचित जमाती प्रवर्गातून सरपंच पदावर निवडून आल्यानंतर वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु तब्बल ३ वर्षांनंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.
या संदर्भात रिंकेश मेश्राम यांनी सरपंच मालती डडेमल यांच्या विरोधात अपात्र करण्याची कारवाईसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली होती. या प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर सरपंच मालती डडेमल ह्या दोषी आढळून आल्याने सरपंच पदावरून अपात्र असल्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिला आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
राजकीय डावपेच रंगणार
८ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०२७ मध्ये होणार असून निवडणुकीला १६ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आता सरपंच पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे राजकीय डावपेच रंगणार आहे.

