LatestNewsगोंदिया- भंडारा

मॅंगनीजचा ढिगारा कोसळला; माडगी येथील युनिव्हर्सल फेरो कंपनीत ३ महिला मजूर गंभीर जखमी!

तुमसर तालुक्यातील धक्कादायक घटना : सुरक्षेचा बोजवारा
तुमसर (भंडारा) :
तालुक्यातील माडगी येथील गेल्या २० ते २२ वर्षांपासून बंद पडलेल्या युनिव्हर्सल फेरो कंपनीच्या परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. येथील तब्बल ५० वर्षांपासून साचलेल्या वेस्ट मटेरियलच्या ढिगाऱ्यातून मॅंगनीज काढण्याचे काम सुरू असताना, अचानक वाळू, माती आणि मॅंगनीजचा भलामोठा ढिगारा मजुरांवर कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने तीन महिला मजूर गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कांचन सेलोकर (वय ५०), चंद्रकला टिचकुले (वय ५२) आणि सुमन वहिले (वय ५५) अशी जखमी महिलांची नावे आहेत. जखमींपैकी चंद्रकला आणि सुमन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने भंडारा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर कांचन यांच्यावर तुमसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माडगी येथील ही कंपनी अनेक वर्षांपासून बंद असली, तरी परिसरात मोठ्या प्रमाणात मॅंगनीजचा साठा पडून आहे. सध्या या टाकाऊ साहित्यातून (वेस्ट मटेरियल) मॅंगनीज वेगळे करण्याचे काम सुरू असून, येथे रोजंदारीवर सुमारे ३० ते ३५ महिला व पुरुष मजूर काम करत आहेत. मंगळवारी सकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास मजूर काम करत असताना हा ढिगारा अचानक खचला. ढिगारा कोसळताच परिसरात एकच किंचाळ्या आणि अफरातफरी माजली. आसपासच्या नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी धाव घेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलांना बाहेर काढले. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मजुरांना साधे हेल्मेट, सुरक्षा बेल्ट किंवा बूट यांसारखी अत्यावश्यक साधनेही पुरवली गेली नव्हती. केवळ नफ्यासाठी मजुरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
प्रशासकीय यंत्रणेकडे कारवाईची मागणी
या घटनेनंतर तुमसर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत आहे. कामगार विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी आणि मजुरांच्या जीवाला कारणीभूत ठरणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *