LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

जिवतीत अवैध सागवान वाहतूक; चार तस्करांना बेड्या!

सोरेकसा-शेनगाव मार्गावर कारवाई : सहा लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त
जिवती (चंद्रपूर) :
वनपरिक्षेत्रातील सोरेकसा-शेनगाव मार्गावर सुरू असलेल्या सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीचा वनविभागाने रविवारी पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात वनपथकाने कारवाई करून सागवान लाकूड आणि पिकअप वाहन असा एकूण ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून काही संशयित फरार असल्याची माहिती आहे.
मध्यचांदा विभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये, राजुरा उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जिवती वनपरिक्षेत्रातील सोरेकसा ते शेनगाव मार्गावर सागवान लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानंतर विशेष पथक तयार करून संशयित वाहनावर लक्ष ठेवण्यात आले. रात्रीच्या गस्तीदरम्यान शेनगाव परिसरात संशयित पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनातून सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीशी संबंधित पुरावे आढळून आले.
तपासादरम्यान परिसरात सागवान लाकूड साठवून ठेवल्याचेही निदर्शनास आले. वनपथकाने तत्काळ कारवाई करून सागवान लाकूड आणि पिकअप वाहन जप्त केले. जप्त केलेल्या सागवान लाकडाची अंदाजं किंमत १ लाख २१ हजार रुपये, तर पिकअप वाहनाची किंमत सुमारे ५ लाख रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले.
या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून काही संशयित फरार आहेत. प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे. या कारवाईत क्षेत्रसहायक एस. एम. सलामे (शेनगाव), एस. व्ही. सावसागडे, एन. आर. चापले (पाटण), ए. एम.ेडाम (जिवती) तसेच ए. डी. गोरकर, अविनाश राठोड, सय्यद, एम. ई. मोरे, पी. एच. कोवे, आर. सी. टेकाम यांच्यासह वनरक्षक आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. फरार आरोपींच्या मागावर वनविभागाचे पथक आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *