LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

शैक्षणिक कामांच्या रोजच्या कटकटीतून शिक्षकांची मुक्ती; शाळांचा शनिवार आता होणार ‘स्मार्ट’!

● राज्य शासनाचा मोठा निर्णय: दररोज ऑनलाईन माहिती भरण्याची डोकेदुखी थांबली, आता ‘माहितीचा वार शनिवार’
● अध्यापनासाठी मिळणार पुरेसा वेळ; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीकडे लक्ष केंद्रित होणार
नागपूर :
शालेय शिक्षकांकडून वरिष्ठ कार्यालयीन स्तरावरून वारंवार विविध प्रकारची ऑनलाईन व ऑफलाईन माहिती मागवली जात असल्यामुळे अध्यापनासाठी वेळच मिळत नसल्याची ओरड शिक्षकांमधून होत होती. या गंभीर समस्येची दखल घेत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शिक्षकांना शैक्षणिक कार्यपद्धतीपेक्षा अशैक्षणिक कामांमध्येच आपला अधिक वेळ घालवावा लागत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली होती. ही रोजची कटकट संपवण्यासाठी आता राज्य सरकारने ‘माहितीचा वार शनिवार’ हा अभिनव उपक्रम राज्यभर राबविण्याचे निश्चित केले आहे. या नव्या निर्णयानुसार, शाळा स्तरावरून दररोज मागवली जाणारी ऑनलाईन व ऑफलाईन माहिती आता रोजच्या रोज सादर करावी लागणार नाही. आठवडाभरातील सर्व आवश्यक माहिती एकत्रित करून ती केवळ शनिवारीच सादर करण्याचे निर्देश राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सध्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबतचे अहवाल, उपक्रमांची माहिती तसेच जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावरील विविध माहिती शाळांकडून सातत्याने मागवली जाते. यामुळे शिक्षकांचा मोठा वेळ माहिती संकलन करणे, अहवाल तयार करणे आणि ऑनलाईन पोर्टलवर माहिती अपलोड करण्यातच वाया जात असल्याचे निदर्शनास आले होते. परिणामी, मूळ काम असलेल्या अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे शिक्षकांना अपेक्षित लक्ष देता येत नव्हते. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून अध्यापनासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग यशस्वी!
वरिष्ठ स्तरावरून होणाऱ्या या माहितीच्या भडिमार समस्येवर उपाय म्हणून प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यांमधील काही निवडक केंद्रांवर हा प्रयोग पथदर्शी स्वरूपात राबविण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, बीड जिल्ह्यातील आष्टी, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली या तालुक्यांतील प्रत्येकी एका केंद्रात ‘माहितीचा वार शनिवार’ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. या प्रायोगिक तत्त्वावरील अंमलबजावणीला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता याची राज्यभर व्यापक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *