टॉवर टेकडीच्या जंगलात २० जुगाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
४० लाखांचा मुद्देमाल जप्त : रामनगर पोलिसांची धडक कारवाई
चंद्रपूर : शहरानजीकच्या टॉवर टेकडी भागातील घनदाट जंगल परिसराचा फायदा घेऊन सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अत्यंत नाट्यमयरित्या छापा टाकला. पोलिसांनी वेशांतर करून जंगलाला चोहोबाजूंनी घेराव घालत धाड टाकत हा अड्डा उधळून लावला. या धडक कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह नगदी व इतर वाहने असा तब्बल ४० लाख ४ हजार ७७१ रुपयांचा अवाढव्य मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी २० जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ प्रमोद चौगुले आणि रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सपोनि हनुमान उगले, पोहवा अमोल गिरडकर, मिलिंद दोडके, आनंद खरात, राजू चिताडे आदींनी केली.

वेशांतर अन् काटेरी झुडपांतून गनिमी कावा
टॉवर टेकडीजवळील झाडा-झुडपांत जुगार खेळत असल्याची माहिती एसडीपीओ प्रमोद चौगुले यांना मिळाली. त्या ठिकाणी जाण्यासाठी केवळ एकच पायवाट असल्याने पोलिसांचे पथक थेट गेल्यास जुगारी पळून जाण्याची शक्यता होती. माहिती मिळताच एसडीपीओ चौगुले व ठाणेदार एकुरके यांनी रणनीती आखली. थेट न जाता वेशांतर केले आणि रात्री १०:३६ वाजेच्या सुमारास जंगलातील काटेरी झाडे-वेलींमधून हळूहळू पुढे सरकत चोहोबाजूंनी जुगार अड्ड्याला वेढा घातला. अचानक झालेल्या छाप्यामुळे जुगाऱ्यांची मोठी पळापळ झाली.
हे आहेत अटकेतील आरोपी
इम्रान खान रशीद खान (बाबूपेठ), अनिल पंढरीनाथ डोंगडे (शांतीनगर), सागर मुरली नागरे (रयतवारी), मन्सूर असरार अहमद (रयतवारी), अर्शद चांद शेख (बाबूपेठ), अमोल निळकंठ तडस (बाबूपेठ), सुरेश पुनराज वावरे (बाबूपेठ), गुढू अंडेवाला (बल्लारशा), हरी पुजारी (बल्लारशा), अमित माखन गुप्ता (महाकाली कॉलनी), जावेद शेख (बल्लारशा), भिमराव माउलीकर (बाबूपेठ), सूरज उर्फ सुरा (लालपेठ), वतन कांबळे (बाबूपेठ), सादीक ईराणी, राहुल कोमटी (लालपेठ), येलन्ना मामीडवार (लालपेठ), राज बब्बर (लालपेठ), मुन्ना पोल मिश्रा (लालपेठ), धनराज सावरकर (अंचलेश्वर गेट) यांना अटक केली.

