LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

सावलीत २९ रानटी हत्तींचा डेरा; ‘गजराज’ पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड!

मोठ्या तलावात दिवसभर मुक्काम : सावली-कवठी मार्ग सुरक्षेसाठी बंद, परिसरात भीतीसह उत्सुकता
सावली (चंद्रपूर) :
गेल्या आठवड्याभरापासून परिसरात धुमाकूळ घालून नागरिकांची झोप उडवणाऱ्या २९ रानटी हत्तींच्या झुंडीने आता आपला मोर्चा सावली उपवन क्षेत्राकडे वळविला आहे. रविवारी रात्री या हत्तींच्या कळपाने सावली येथील मोठ्या तलाव परिसरात अचानक मुक्काम ठोकल्याने संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी दिवसभर हा कळप तलावात आणि परिसरातच विसावला होता. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच हत्तींना पाहण्यासाठी स्थानिक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा २९ हत्तींचा कळप आकासपूर एमआयडीसी परिसरातून सावली भागात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कळप वेगवेगळ्या शेतशिवारात आणि जंगलात वावरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारी सकाळी तलाव परिसरात हत्ती असल्याचे स्पष्ट होताच, अबालवृद्धांसह महिला व युवकांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ टिपण्यासाठी एकच गर्दी केली. काही अतिउत्साही नागरिकांनी हत्तींच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
वाहतूक रोखली, पोलीस व वनविभाग तैनात
नागरिकांची वाढती गर्दी आणि संभाव्य धोका लक्षात घेता पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. वनरक्षक आणि पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर रोखून धरले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने सावली-कवठी मार्गासह मुख्य नहराचा रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद केला होता, ज्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
……………………………………..
पिकांचे नुकसान; रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन
हत्तींच्या या वावरामुळे परिसरातील काही शेतांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीच्या वेळी हा कळप गावाच्या किंवा मानवी वस्तीच्या दिशेने सरकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये आणि हत्तींच्या जवळ जाण्याचे धाडस करू नये, असे जाहीर आवाहन वनविभागाने केले असून वनकर्मचारी या कळपावर डोळ्यात तेल घालून बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *