LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा! किरीट सोमय्यांच्या बैठकीला एमआयएम, उद्धव सेनेचा तीव्र विरोध; गाडीवर फेकले टोमॅटो!

मनपा परिसरात तुफान राडा! सोमय्यांच्या वाहनासमोर नगरसेवकांचे लोटांगण; पोलिसांनी फरफटत नेले!
अमरावती :
अमरावती महानगरपालिकेत गुरुवारी भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आढावा बैठकीवरून प्रचंड राडा झाला. मनपातील कथित ‘जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या’वर चर्चा करण्यासाठी सोमय्या येथे आले असता, एमआयएम आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला. सध्या विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना राजकीय नेत्याला बैठक घेण्याची परवानगी कशी दिली? असा सवाल करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दुपारी ठीक २:३० वाजता किरीट सोमय्या यांचा ताफा मनपात पोहोचताच एमआयएम आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘किरीट सोमय्या वापस जाओ’, ‘सोमय्या मुर्दाबाद’ अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून सोडला होता. अखेर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना मोठे कष्ट घ्यावे लागले.
या आंदोलनादरम्यान एमआयएमचे नेते अब्दुल हमीद आणि नगरसेवक मुनज्जर अली हे कमालीचे आक्रमक झाले होते. सोमय्या यांची गाडी रोखण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी थेट त्यांच्या वाहनासमोर उड्या टाकल्या आणि रस्त्यावर लोटांगण घातले. यामुळे महापालिकेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अब्दुल हमीद आणि मुनज्जर अली यांना रस्त्यावरून फरफटत बाजूला नेले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोमय्यांच्या गाडीवर टोमॅटोही फेकले. या अचानक झालेल्या गदारोळानंतर मनपा परिसरात तैनात असलेल्या सिटी कोतवाली पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ५ नगरसेवकांसह अंदाजे २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ६८ अन्वये नोंद करून सुटका करण्यात आली. या संपूर्ण गदारोळात पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि रमेश धुमाळ हे स्वतः उपस्थित होते.
दुसरीकडे, बाहेर विरोधकांचा प्रचंड गदारोळ सुरू असताना, पोलिसांनी सोमय्या यांना कडेकोट सुरक्षेत महापालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या दालनात नेले आणि तिथे पोलीस बंदोबस्तात बैठक पार पडली. या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेता चेतन गावंडे, महापालिका आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे आदी उपस्थित होते. या बैठकीत कथित बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, आचारसंहितेच्या काळात झालेल्या या बैठकीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात बोलताना ठाकरे सेनेचे नगरसेवक संजय वाघमारे यांनी आरोप केला की, “सध्या आचारसंहिता सुरू असताना सोमय्या अधिकृत बैठक कशी काय घेऊ शकतात? ते अमरावती आणि महाराष्ट्राचे वातावरण जाणीवपूर्वक खराब करत आहेत.” तर दुसरीकडे मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्पष्ट केले की, “किरीट सोमय्या हे बैठकीसाठी नव्हे तर केवळ चर्चेसाठी आले होते. जुन्या सॉफ्टवेअरमधून नवीन सॉफ्टवेअरमध्ये जन्म प्रमाणपत्रात सुधारणा करताना बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याचा त्यांचा आक्षेप आहे, जो तपासणीनंतरच स्पष्ट होईल. आम्ही त्यांना आचारसंहितेची पूर्वकल्पना दिली होती.”

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *