वाघाला जेरबंद करण्यासाठी आठ ट्रॅप कॅमेरे; १५ कर्मचारी तैनात!
तळोधी (बा.) परिसरातील शेतकरी मृत्यू प्रकरण : दोन लाईव्ह कॅमेऱ्यांद्वारे २४ तास डिजिटल नजर
तळोधी (बा.) (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथे मंगळवारी (दि. ४) शेतकरी रमेश जयराम काशीवार (५५) यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने परिसरात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाघाचा मागोवा घेण्यासाठी ८ ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून, त्यातील दोन अत्याधुनिक लाईव्ह कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास डिजिटल नजर ठेवली जात आहे.
सध्या शेतीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी १५ वन कर्मचाऱ्यांचे विशेष पथक रात्रंदिवस गस्त घालत आहे. नागभीडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगचारे यांनी नागरिकांना जंगलालगत एकटे न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, वाघाला जेरबंद करण्यासाठी अद्याप पिंजरा लावण्यात आलेला नाही. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून तातडीने मंजुरी मिळावी म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आला असून परवानगी मिळताच पिंजरा लावून वाघाला जेरबंद केले जाईल, असे वनविभागाने स्पष्ट केले. वनविभागाने मृत रमेश काशीवार यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. तरीही जनकापुरात वाघाचा मुक्त वावर कायम असल्याने, वाघाला तातडीने जेरबंद करून बळीराजाला भयमुक्त करा, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.

