माहिती मागितल्याचा राग; पं. स. सदस्यासह महिला सरपंचाची तरुणाला मारहाण!
विरली खुर्दची घटना; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दोन्ही गटांतील आरोपींवर लाखानी/लाखांदूर पोलिसांत गुन्हे दाखल
लाखांदूर (भंडारा) : ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकारांतर्गत ग्रामसेवकाकडून माहिती घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला पंचायत समिती सदस्यासह महिला सरपंचाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना ४ ऑगस्ट रोजी लाखांदूर तालुक्यातील विरली (खुर्द) येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात घडली.
या प्रकरणी विरली (खुर्द) येथील पीडित युवक तुषार दयाराम भागडकर (२६) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी विरली (खुर्द) येथीलच विद्यमान पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी (४२) आणि महिला सरपंच शारदा जितेंद्र पारधी (३५) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेच्या काही दिवसांपूर्वी विरली (खुर्द) येथील पांडुरंग ठाकरे (३१) या युवकाने ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारांतर्गत विविध विषयांची माहिती मागण्यासाठी अर्ज केला होता. या अर्ज प्रकरणानुसार ४ ऑगस्ट रोजी ग्रामसेवकाने अर्जदाराला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून माहिती दिली. ग्रामपंचायतीत उपस्थित महिला सरपंचाचे पती आणि महिला सरपंचाने अर्जदारासोबत आलेल्या तरुणाला शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिला सरपंचाला मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल
विरली (खुर्द) ग्रामपंचायतीच्या सरपंच कक्षात उपस्थित महिला सरपंचाला स्थानिक ५ व्यक्तींनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी विरली (खुर्द) येथील हरिश्चंद्र भागडकर (वय ४५), जनार्दन भागडकर (वय ३९), अश्विन भागडकर (वय २३), अक्षय भागडकर (वय २१) आणि तुषार भागडकर (वय २५) या आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

