LatestNewsगुन्हेवार्तामहाराष्ट्रविदर्भ

अनैतिक संबंधातून प्रेयसीची हत्या, आरोपीला जन्मठेप!

सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पतीवरही केला होता प्राणघातक हल्ला; एकूण ८ हजार रुपयांचा दंड
नागपूर :
पतीकडे परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रेयसीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आणि तिच्या पतीवरही प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला बुधवारी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. याशिवाय त्याला एकूण ८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विनय मुगलीकर यांनी हा निर्णय दिला.
ही थरारक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सचिन पुरुषोत्तम पेंदोर असे आरोपीचे नाव आहे. मृत महिला आणि पेंदोर यांच्यात अनैतिक संबंध होते. मात्र, काही कारणांमुळे महिलेने आरोपीशी नाते तोडून पालकांकडे राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर पालकांच्या विनंतीवरून तिचा पती तिला आदराने घरी नेण्यासाठी सासरी आला होता.
घटनेच्या रात्री महिला व तिचा पती जेवण करून गाढ झोपले असताना, प्रेयसीने सोडल्याच्या रागात आरोपी सचिन पेंदोर कुऱ्हाड/टिकाव घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास गुपचूप घरात शिरला. त्याने झोपेत असलेल्या प्रेयसीवर व तिच्या पतीवर टिकावाने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पती रक्ताच्या थारोळ्यात पडला.
अशी झाली शिक्षा
१. भादंवि कलम ३०२ (हत्या): जन्मठेप आणि ५,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कैद.
२. भादंवि कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न): १० वर्षे सक्तमजुरी आणि ३,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कैद.
पती ठरला मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार
गंभीर जखमी अवस्थेतही पतीने आरोपीला हल्ला करताना ओळखले होते. या घटनेनंतर मृत महिलेच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. न्यायालयात सरकारी वकील रवींद्र भोयर यांनी १५ साक्षीदार तपासले. यात पतीची प्रत्यक्षदर्शी साक्ष, मृत महिलेच्या आई व बहिणीचा जबाब आणि तांत्रिक पुरावे आरोपीला दोषी ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *