LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदियात गांजासह ५४ लाखांचा माल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

रायपूरहून नागपूरकडे ‘थार’मधून होत होती तस्करी
थरारक पाठलाग करून दोघांना अटक, एक फरार
गोंदिया :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वरून ‘महिंद्रा थार’ या आलिशान गाडीतून अवैधरित्या गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेला (L.C.B.) मोठे यश आले आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सौंदड रेल्वे उड्डाणपुलाजवळ रविवारी (दि. २४ मे) रात्रीच्या सुमारास केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी ३८ किलो ५०० ग्रॅम गांजा, एक थार कार आणि ४ मोबाईल असा एकूण ५४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांनी दिले आहेत. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात पथक गस्त घालत होते. यावेळी रायपूर (छत्तीसगड) येथून एका काळ्या रंगाच्या महिंद्रा थार कारमधून गांजाची मोठी खेप राष्ट्रीय महामार्गावरून देवरी-कोहमारा मार्गे नागपूरला नेली जाणार असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे एल.सी.बी. च्या पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सौंदड रेल्वे उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी केली. काही वेळातच रायपूरकडून एक काळ्या रंगाची थार कार येताना दिसली. मात्र, पोलिसांची नाकाबंदी पाहताच चालकाने गाडी वळवून विरुद्ध दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता थरारक पाठलाग करून गाडी थांबवण्यास भाग पाडले. गाडी थांबताच आतील तीन जणांनी जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. पोलिसांनी चपळाईने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले, तर तिसरा आरोपी अंधाराचा आणि झुडपी जंगलाचा फायदा घेत पसार झाला.
पोलिसांनी पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली असता, डिक्कीत आणि सीटवर प्लास्टिकच्या पिशवीत खाकी रंगाच्या टेपने गुंडाळलेले तब्बल ४० बंडल आढळून आले. ते उघडून पाहिले असता त्यात पाने, फुले आणि बिया मिश्रित हिरवा ओलसर गांजा सापडला. पोलिसांनी ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा ३८.५ किलो गांजा, १५ लाख रुपयांची थार कार आणि ८० हजार रुपयांचे ४ मोबाईल असा एकूण ५४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात सपोनि धीरज राजूरकर, पोलीस हवालदार तुलसीदास लुटे, दीक्षितकुमार दमाहे, संजय चव्हाण, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, सामेंद्रसिंह तुरकर आणि पोलीस शिपाई सुनील डहाके, इंदुरकर, घनश्याम कुंभलवार, राम खंदारे, लक्ष्मण बंजार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. पुढील तपास डुग्गीपार पोलीस करत आहेत.
नागपूरला पोहोचवली जाणार होती खेप:
याप्रकरणी पोलिसांनी विवेककुमार अश्विनीकुमार जोशी (वय २१) आणि एका विधीसंघर्ष बालकाला (दोघेही रा. डोंगरगढ, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्यांनी सदर गांजा नागपूर येथील सागर खोब्रागडे याला विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. तसेच, पळून गेलेल्या साथीदाराचे नाव सुफियान उर्फ सोफी रजा (वय २८, रा. डोंगरगढ) असल्याचे सांगितले.
यावरून नागपूरचा खरेदीदार, पसार झालेला आरोपी आणि पकडण्यात आलेले दोघे अशा एकूण चारही आरोपींविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *